राज्य सरकारच्या गृहखात्याने एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचा राजीनामा स्वीकारला आहे. प्रदीप शर्मा हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक होते. प्रदीप शर्मा यांनी जुलै महिन्यातच तडकाफडकी राजीनामा दिला होता. त्यानंतर ते निवडणूक लढवू शकतात अशीही चर्चा रंगली होती. आता एएनआयनेही ही शक्यता वर्तवली आहे. प्रदीप शर्मा येत्या विधानसभा निडवणुकीत निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याचं एएनआयने म्हटलं आहे.

४ जुलै रोजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. तो आज राज्य सरकारच्या गृहखात्याने स्वीकारला. प्रदीप शर्मा ठाणे गुन्हे शाखेत कार्यरत होते. २००८ मध्ये प्रदीप शर्मा पोलीस दलातून निलंबित झाले होते. नऊ वर्षांच्या कालावधीनंतर म्हणजेच २०१७ मध्ये ते पोलीस सेवेत पुन्हा रुजू झाले. १९८३ मध्ये पोलीस दलात दाखल झालेले पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांची कारकीर्द वादात राहिली. नव्वदच्या दशकात जेव्हा गुन्हेगारी टोळ्यांचे प्रमाण वाढले होते तेव्हा चकमकफेम प्रदीप शर्मा यांनी अनेक गुन्हेगारांना संपवले.

प्रदीप शर्मा यांनी आत्तापर्यंत १०० पेक्षा जास्त गुन्हेगारांचे एन्काऊंटर केले आहे. रामनारायण गुप्ता उर्फ लखनभय्या याचे बनावट एन्काऊंटर आणि कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध या आरोपांमुळे २००८ मध्ये शर्मा यांना निलंबित करण्यात आलं होतं. लखनभय्या एन्काऊंटर प्रकरणात प्रदीप शर्मा यांच्यासह १३ जणांना अटकही करण्यात आली होती. मात्र २०१३ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने शर्मा यांची आरोपातून मुक्तता केली. तेलगी बनावट मुद्रांक प्रकरणातील आरोपांमधूनही त्यांची मुक्तता करण्यात आली.

सगळ्या आरोपांतून मुक्त झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा पोलीस दलात रुजू करून घ्यावं म्हणून प्रदीप शर्मा यांनी महाराष्ट्र प्रशासकीय लवादाकडे दाद मागितली होती. काही महिने दुर्लक्ष केल्यानंतर गृहखात्याने त्यांना पोलीस सेवेत रुजू करून घेतलं. मात्र ४ जुलै रोजी त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला जो आज स्वीकारण्यात आला आहे.