News Flash

म्हाडाच्या मार्गदर्शन शिबिरात उमेदवारांची गैरसोय

‘टोकन’ मिळूनही फेऱ्यांचा फेरा

म्हाडाच्या मार्गदर्शन शिबिरात उमेदवारांची गैरसोय
( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

‘टोकन’ मिळूनही फेऱ्यांचा फेरा

घरांच्या सोडतीत यशस्वी ठरलेल्या उमेदवारांना पात्रता निश्चितीसाठी थेट प्रमाणपत्र देण्यासाठी म्हाडाने प्रथमच मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे. मात्र या शिबिरात टोकन मिळूनही उमेदवारांना फेऱ्या माराव्या लागत आहेत. म्हाडाने या आरोपांचा इन्कार केला आहे.

म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे घरांसाठी नुकतीच सोडत काढण्यात आली. प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांचा यात पहिल्यांदाच समावेश करण्यात आला होता. योजनेतील यशस्वी अर्जदारांच्या पात्रता निश्चितीसाठी म्हाडा मुख्यालयात २७ ऑगस्टपासून विशेष मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात पाच हजार सदनिकांसाठी यशस्वी अर्जदारांची कागदपत्रे पडताळून त्यांना थेट देकार पत्रे दिली जाणार असल्याचे म्हाडातर्फे सांगण्यात आले होते. मात्र या शिबिरात आलेल्या अर्जदारांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. अर्जदारांना या शिबिरात टोकन दिले जात होते. मात्र टोकन मिळून आणि पूर्ण वेळ थांबूनही अर्ज पडताळणीसाठी नंबर लागला नव्हता.

‘मला काल टोकन मिळाले होते. पण प्रक्रिया साडेपाच वाजता संपल्यामुळे पुन्हा आज यावे लागले,’ असे जितेंद्र शिंदे यांनी सांगितले. अनेक लोक टोकन घेण्यासाठी सकाळी सात वाजताच रांगा लावत होते. इथले कर्मचारी प्रत्यक्ष कामाला साडे अकरा वाजता सुरवात करतात. एकावेळी पाच जणांना आत सोडण्यात येते, प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी वेळ लागतो, असेही त्यांनी सांगितले.

ठाण्याहून आलेल्या लोकेश्वर निमजे यांनीही अशीच तक्रार केली. मी आदल्या दिवशी आलो होतो. पण टोकन मिळालेच नव्हते. त्यामुळे आज पुन्हा आलो. आजही शंभरावा क्रमांक होता आणि नंबर आला नाही,अशी तक्रार त्यांनी केली.

या शिबिरात एकूण ३५ केंद्रे आहेत. प्रत्येक ठिकाणी एक अधिकारी आणि एक कर्मचारी असून ते अर्जदारांची प्रक्रिया पूर्ण करून घेतात. कागदपत्रे प्रत्येक अधिकाऱ्याकडून तपासून घेतली जातात. ज्यांची कागदपत्रे पूर्ण आहेत आणि जे पात्र आहेत त्यांना ‘ऑफर लेटर’ दिले जाते.

म्हाडाने मात्र अर्जदारांची गैरसोय होत असल्याच्या आरोपाचा इन्कार केला. याबाबत माहिती देताना कोकण गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय लहाने यांनी सांगितले की, दररोज सकाळी १० वाजता प्रक्रिया सुरू होते आणि वेळेत संपते. दिवसाला तीनशे ते सव्वा तीनशे अर्जदारांना प्रमाणपत्रे दिली जात आहेत. जे लांबून आले आहेत त्यांच्या विनंतीवरून त्याच दिवशी टोकन देऊन त्यांचे काम करून दिले जात आहे, असे ते म्हणाले. या शिबिराला मुदतवाढ देण्याचा निर्णय अजून झाला नसल्याचे ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2018 2:03 am

Web Title: maharashtra housing and area development authority
Next Stories
1 महामंडळांवरील रखडलेल्या नियुक्त्यांना मुहूर्त!
2 पूर्वप्राथमिक वर्गासाठी अभ्यासक्रम निश्चित
3 मुंबईतील ११ महाविद्यालयीन मुलींचं लैंगिक शोषण करून ब्लॅकमेल करणाऱ्या भामट्याला अटक
Just Now!
X