News Flash

माझ्या ‘गो करोना’ घोषणांमुळे महाराष्ट्रात कमी रुग्ण: रामदास आठवले

"आम्ही करोनाला जायला सांगितलं आहे. पण तो..."

माझ्या ‘गो करोना’ घोषणांमुळे महाराष्ट्रात कमी रुग्ण: रामदास आठवले
रामदास आठवले

चीनसह जगभर थैमान घालणाऱ्या करोना विषाणूने भारतात पहिला बळी घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये उपचारादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या वृद्धास करोनाची लागण झाली होती, असे गुरुवारी स्पष्ट झाले. दरम्यान, पुणे, मुंबईपाठोपाठ ठाण्यातही करोनाचा रुग्ण आढळला आहे. मुंबई आणि ठाण्यात प्रत्येकी एकास करोनाची लागण झाल्याचे गुरुवारी स्पष्ट झाल्याने महाराष्ट्रातील रुग्णसंख्या १४ वर पोहोचली. तर देशातील करोनाबाधितांची संख्या ७४ वर पोहोचली आहे. करोनाचा फैलाव सुरु झाल्याच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये करोनासंदर्भातील जनजागृतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या एका प्रचारफेरीमध्ये केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ‘गो करोना… गो… गो करोना…’ अशी घोषणाबाजी केली होती. त्यावरुन अनेकांनी त्यांच्यावर टीकाही केली होती. मात्र आता मी ‘गो करोना… गो… गो करोना…’ अशी घोषणाबाजी केल्याने महाराष्ट्रात करोनाचा कमी रुग्ण सापडल्याचे वक्तव्यही आठवले यांनी केलं आहे.

व्हायरल झाला व्हिडिओ

करोनाबद्दल देशभरामध्ये भितीचे वातावरण आहे. मात्र सरकारने सर्व उपाययोजना केल्या असून घाबरण्याचे कारण नाही असं सरकारी यंत्रणांकडून स्पष्ट केलं जातं आहे. असं असतानाच काही दिवसांपू्र्वी आठवलेंचा एका व्हिडिओ व्हायरल झाला होता. मुंबईमध्ये चीनी नागरिकांनी आयोजित केलेल्या प्रचारफेरीमध्ये आठवले सहभागी झाले होते. चीनचे भारतातील काऊन्सील जनरल तांग गुइलाई हेही यावेळेस उपस्थित होते. आठवले आंदोलनाच्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी भारत चीन संबंध सुदृढ राहोत असं म्हटलं आणि ‘गो करोना… गो… गो करोना… गो’ अशा घोषणा देऊ लागले. आठवले यांना घोषणा देताना बघून उपस्थितांनाही हुरूप आला आणि परदेशी नागरिकांनीही ‘गो करोना’च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. हा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला.

फोटो >> ‘Go Corona… Go Corona’ वरुन रामदास आठवले ट्रोल; पाहा व्हायरल मीम्स

आम्ही म्हटलं म्हणून…

“मी गो करोना असं म्हटलं आहे. त्यामुळे तो महाराष्ट्र काय तर भारतामध्येही जास्त पसरलेला नाही. तरीही सरकारकडून यासंदर्भात काळजी घेतली जात आहे. आम्ही करोनाला जायला सांगितलं आहे. पण तो होऊ नये यासंदर्भातील काळजी घेणं आपली जबाबदारी आहे. डॉक्टरांची जबाबदारी आहे. आपल्या गावामध्ये, आपल्यामध्ये करोना येता कामा नये यासाठी आपणही काळजी घेणं गरजेचं आहे,” असं मत आठवले यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं.

 

ट्रोलर्सला उत्तर…

या व्हिडिओवरुन ट्रोल करणाऱ्यांनाही आठवलेंनी उत्तर दिलं होतं. “गो कोरोना नाही, तर मग काय कम कोरोना म्हणू का?”, असा सवाल उपस्थित करत आठवलेंनी घोषणाबाजीचं समर्थन केलं होतं. “एवढा गंभीर आजार देशात दाखल झाला असताना कोरोना गो नाही, तर मग काय कोरोना या असं म्हणणार आहे का? कोरोना कम असं मी कधीच म्हणणार नाही. कोरोना गो असंच मी म्हणेल. यावरुन टीका करण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं. माझ्यावर टीका करणाऱ्या कोणावरही मी टीका करणार नाही. कोरोना गो म्हणजे कोरोनाने येथून जावं अशी माझी भूमिका आहे. कोरोनाने येथे येऊ नये आणि आला असेल तर येथून जावं, अशी प्रतिकात्मक भूमिका मी घेतली आहे. करोना देशातून जात नाही तोपर्यंत मी गो करोना असंच म्हणत राहिलं,” असं आठवलेंनी स्पष्ट केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 13, 2020 9:07 am

Web Title: maharashtra india less coronavirus patients because of my go corona slogans ramdas athawale scsg 91
Next Stories
1 विद्यार्थिनीवर मुलताईमध्ये अत्याचार
2 पालघरवर डासांचा हल्ला
3 भूजल पातळीत यंदा वाढ
Just Now!
X