03 June 2020

News Flash

आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ बरखास्त

त्रुटी आणि आक्षेपांमुळे शालेय शिक्षणमंत्र्यांचा निर्णय

‘लोकसत्ता’ने आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळातील त्रुटी वेळोवेळी दाखवून दिल्या आहेत.

त्रुटी आणि आक्षेपांमुळे शालेय शिक्षणमंत्र्यांचा निर्णय

मुंबई : ‘महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळा’त अनेक त्रुटी असून, त्याबाबत गंभीर तक्रारी आहेत. याबाबत सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन हे मंडळ तात्काळ बंद करण्यात येत असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी बुधवारी विधान परिषदेत जाहीर केले.

राज्यातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे, या उद्देशाने ‘महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळा’ची स्थापना करण्यात आली होती. मात्र, या शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम नेमका कोणी तयार केला, तसेच चौथीच्या पुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराजांचा धडा का वगळण्यात आला, यांसह राज्यात दोन शिक्षण मंडळे कशासाठी हवी, असा सवाल करत आमदार कपिल पाटील, सतीश चव्हाण आदी सदस्यांनी हे मंडळ बंद करण्याची मागणी केली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार रणजित पाटील आणि भाई गिरकर आदींनी या मंडळाच्या कारभाराची सरकारने चौकशी करावी, मात्र मंडळ बरखास्त करू नये, अशी आग्रही भूमिका मांडली.

आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळांतर्गत एकूण ८३ शाळा सुरू असून, आता चौथीत गेलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची आबाळ होऊ शकते. तसेच जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांचाही यात समावेश असल्यामुळे गरिबांना चांगले शिक्षण मिळू नये का, असा सवालही काही सदस्यांनी या वेळी केला. मात्र, हे मंडळ बंद करण्यात येत असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केले.

झाले काय?

‘महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळा’चा अभ्यासक्रम कोणी तयार केला, यासह अनेक प्रश्न सदस्यांनी उपस्थित करत मंडळ बंद करण्याची मागणी केली. पीठासीन अधिकाऱ्यांनीही हे शिक्षण मंडळ बंद करण्याची भूमिका मांडली. त्याचा आधार घेत शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी पीठासीन अधिकारी आणि सदस्यांच्या भावना लक्षात घेत महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ बंद करण्यात येत असल्याचे जाहीर केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2020 3:38 am

Web Title: maharashtra international board of education dismissed zws 70
Next Stories
1 ‘लोकसत्ता’च्या वतीने उद्या कवितेचा ‘अभिजात’ जागर
2 राज्यातून ‘संपूर्ण मराठी माध्यम’ ही संकल्पनाच हद्दपार
3 पक्ष, संघटनांच्या कार्यक्रमात सहभागी होण्यास विद्यापीठांना मनाई
Just Now!
X