कला, संस्कृती, ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक समस्यांवर लघुपट
कला, संस्कृती, ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक समस्या, जाणिवा, जागतिक घडामोडी यांसारखे असंख्य विषय डोळ्यासमोर ठेवून सृजनात्मक आणि कलात्मक लघुपटांची निर्मिती करणाऱ्या लघुपटकारांसाठी ‘महाराष्ट्र इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल’चे आयोजन पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतर्फे करण्यात आले आहे, तर महोत्सवाचे संयोजन सिनेमॅटिक व्हिजन एन्टरटेन्मेंट ही संस्था करणार आहे. हा महोत्सव २५ ते २७ मार्चदरम्यान मिनी थिएटर, रवींद्र नाटय़ मंदिर येथे होणार आहे. महोत्सवात निवडक लघुपटांच्या स्क्रीिनगसोबत विविध वर्कशॉप, चित्रपटसृष्टीतल्या मान्यवरांचे पॅनल डिस्कशन, मार्गदर्शन आणि प्रश्नोत्तरे यांसारख्या कार्यक्रमांची पर्वणी असणार आहे. या महोत्सवासाठी लघुपटकारांकडून प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत.
महोत्सवासाठी लघुपटांच्या तीन वर्गवारी करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सामाजिक जनजागृती (सोशल अवेअरनेस), काल्पनिक (फिक्शन) आणि आंतररराष्ट्रीय (इंटरनॅशनल) या वर्गवारींचा समावेश करण्यात आला आहे.
राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या या महोत्सवासाठी विनामूल्य प्रवेशिका पाठविण्याची अंतिम तारीख २४ फेब्रुवारी ही आहे. तरी डीव्हीडी पाठविण्याची तारीख २९ फेब्रुवारी आहे.
या महोत्सवात फिल्म अ‍ॅप्रिशिएशन, स्टोरी आयडिया अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट, रेक्शन अ‍ॅण्ड प्रोडक्शन सिनेमॅटोग्राफी, साउंड डिझाइन, हाऊ टू जनरेट रीव्हेन्यू फ्रॉम ऑनलाइन मेडिअम अशा विविध विषयांवर चित्रपटसृष्टीतल्या दिग्गजांची वर्कशॉप होणार आहेत. या वेळी उपस्थितांना प्रश्नोत्तरांची संधी मिळणार आहे.
महोत्सवामध्ये चित्रपटसृष्टीतले दिग्दर्शक, निर्माते, कलाकार आणि तंत्रज्ञ यांची उपस्थिती असणार आहे. महोत्सवाचे खास वैशिष्टय़ म्हणजे विजेत्यांना रोख रकमेसहित सुवर्ण, रौप्य, कांस्य अशी सन्मानचिन्हं आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.
या महोत्सवाला सर्वानाच विनामूल्य प्रवेश असेल, पण त्यासाठी या महोत्सवाच्या वेबसाइटवर जाऊन आधीच नाव नोंद करणे आवश्यक आहे, अशी माहिती महोत्सवाचे संयोजक अमितराज निर्मल यांनी दिली.
या महोत्सवासंदर्भात अधिक माहितीसाठी ९७६८९३०८५३, ९९६७३९३००७ या क्रमांकावर आणि http://www.maharashtrainternationalshortfilmfestival.com <http://www.maharashtrainternationalshortfilmfestival.com/ या संकेतस्थळावर संपर्क साधू शकता.