दिनेश गुणे

वर्षांकाठी हजारो मुले-महिला बेपत्ता, केंद्राच्या आकडेवारीतील वास्तव   

महाराष्ट्रातील मुले आणि महिला सुरक्षित नाहीत, हे अस्वस्थ करणारे वास्तव सरकारी आकडेवारीवरून पुन्हा एकदा पुढे आले आहे. दिल्ली, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशखालोखाल महाराष्ट्र हे महिला आणि बालकांसाठी असुरक्षित राज्य बनले असून वर्षांकाठी हजारो मुले-महिला बेपत्ता होत असल्याचे केंद्र सरकारच्या अधिकृत आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

संसदेच्या अलीकडेच संपलेल्या अधिवेशनात १ जानेवारीला लोकसभेत एक अतारांकित प्रश्न विचारला गेला. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याबद्दल त्या प्रश्नकर्त्यां संसद सदस्याने चिंता व्यक्त केली होती. त्यावरील उत्तरातून पुढे आलेले वास्तव विदारक आहे. महिला वा मुलांची सुरक्षितता हा राज्य सरकारांच्या अखत्यारीतील विषय असला तरी केंद्र सरकार अशा प्रकरणांवर सातत्याने नजर ठेवून असते. बेपत्ता मुले-महिलांच्या शोधासाठी केंद्राकडूनही काही पावले उचलली जातात. मुले आणि महिला बेपत्ता होण्यामागे मानवी तस्करीचा धंदा मोठय़ा प्रमाणात कारणीभूत असल्याचेही या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्रात २०१५मध्ये मानवी तस्करीप्रकरणी ६९२ तर २०१७ मध्ये ५१७ गुन्हे नोंदविण्यात आले होते. या दोन वर्षांतील बेपत्ता मुले आणि महिलांची आकडेवारी महाराष्ट्राच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. महाराष्ट्रातून २०१५ मध्ये चार हजार ४५० मुले बेपत्ता झाली होती. त्यापैकी दोन हजार ५४३ मुली होत्या. सन २०१६ मध्ये बेपत्ता झालेल्या चार हजार ३८८ मुलांपैकी दोन हजार ५३२ मुली होत्या. या दोन वर्षांत महाराष्ट्रातून अनुक्रमे २३ हजार ४४३ आणि २५ हजार ७८४ महिलाही बेपत्ता झाल्याचे ही आकडेवारी दर्शविते.

१९,९२० मुले आजही बेपत्ता

केंद्र सरकारच्या ‘ट्रॅक द मिसिंग चाईल्ड’ या ‘जालनिशी’नुसार, महाराष्ट्रातून १९ हजार ९२० मुले आजही बेपत्ता आहेत. २३ फेब्रुवारीच्या ताज्या तपशिलानुसार गेल्या २४ तासांत या ‘जालनिशी’वर गेल्या महिनाभरात ७३ मुले बेपत्ता झाल्याची नोंद असून गेल्या वर्षभरात १६६४ मुले बेपत्ता झाल्याचे दिसते. अर्थात, पोलीस आणि विविध यंत्रणांच्या सतर्कतेमुळे गेल्या महिनाभरात दीड हजारांहून अधिक बेपत्ता मुलांचा ठावठिकाणा शोधण्यात यश आले आहे.