पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा

मुंबई : उद्यमशील तरुणांना उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या धोरणाची अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र पिछाडीवर राहिला आहे, असे केंद्रीय उद्योग मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीत अग्रस्थान पटकावलेल्या गुजरातकडून महाराष्ट्राने धडे घ्यावेत, असा टोला या अहवालाने मारला असल्याची माहिती काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्राला स्टार्टअपची राजधानी करण्याची घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपयशाची जबाबदारी उद्योगमंत्र्यांवर न टाकता स्वत: स्वीकारावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली.

केंद्रात सत्तेवर आल्यानंतर भाजप सरकारने स्टार्ट अप धोरण जाहीर केले आणि त्याची सर्व राज्यांनी अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या. केंद्रीय उद्योग मंत्रालयाने देशातील २७ राज्ये व ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये कशा प्रकारे स्टार्ट अप धोरणाची अंमलबजावणी केली जात आहे, याचा आढावा घेऊन त्याचा अहवाल २० डिसेंबर २०१८ रोजी जाहीर केला आहे. स्टेट स्टार्ट अप रँकिंग या नावाने १६० पानांचा हा अहवाल आहे.

स्टार्ट अपबाबतची विविध राज्यांची कामगिरी मोजण्यासाठी सात प्रवर्गात ३८ निर्देशांक तयार केले होते. त्यातील एकाही प्रवर्गात महाराष्ट्राची कामगिरी दिसून येत नाही. त्याचबरोबर महाराष्ट्राने ३८ पैकी १७ निर्देशांकात कोणतेच काम केलेले नाही. केंद्राच्या धोरणानुसार अन्य राज्यांनी लगेच आपले धोरण जाहीर केली. महाराष्ट्राचे स्टार्टअप धोरण तब्बल चार वर्षांनी म्हणजे १७ जानेवारी २०१८ला जाहीर करण्यात आले. त्यावरून राज्यातील भाजप-शिवसेना सरकारची या धोरणाबाबतची उदासीनता दिसून येते, असे चव्हाण यांनी निदर्शनास आणले.

राज्यात फडणवीस सरकार सत्तेवर आल्यापासून उद्योग क्षेत्राचा विकासदर सातत्याने घसरत आहे, असे चव्हाण म्हणले. २०१५-१६ मध्ये राज्याचा उद्योगाचा विकास दर ७.२ टक्के होता. २०१६-१७ मध्ये ६.९ टक्के झाला. २०१७-१८ मध्ये त्याची ६.५ टक्क्यापर्यंत घसरण झाली. केंद्र सरकारच्या व्यापार सुलभता धोरण अंमलबजावणीच्या क्रमवारीतही महाराष्ट्राची कामगिरी उदासीन आहे. २०१५ मध्ये राज्याचा क्रमांक आठवा होता, २०१६ मध्ये १०वा झाला. २०१७ मध्ये ११वा आणि २०१८ मध्ये १३व्या क्रमांकावर खाली घसरला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

गुजरातकडून शिकवणी!

स्टार्ट अप धोरण अंमलबजावणीत शंभरपैकी १०० गुण मिळवून गुजरात राज्याने प्रथम स्थान पटकावले आहे. महाराष्ट्राला १०० पैकी २५ ते ५० या दरम्यान गुण मिळाले असून क्रमवारीत आपल्या राज्याचे स्थान अगदी तळाशी आहे. या क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या ११ राज्यांकडून पिछाडीवर राहिलेल्या राज्यांनी मार्गदर्शन घ्यावे, असे या अहवालात म्हटले आहे. गुजरातकडून महाराष्ट्राने शिकावे, असे त्यात सुचविण्यात आले आहे. म्हणजे स्टार्ट अप धोरणाची अंमलबजावणी कशी करायची याची महाराष्ट्राची शिकवणी गुजरात घेणार, अशी टिप्पणी चव्हाण यांनी केली.