गेल्या काही वर्षांपासून साखर उत्पादनात सातत्याने आघाडीवर राहिलेल्या महाराष्ट्राची यंदाच्या दुष्काळामुळे मात्र पिछेहाट झाली आहे. साखर उत्पादनात उत्तरप्रदेशाने राज्याला मागे टाकले आहे. राज्याच्या साखर उत्पादनात यंदा तब्बल २५ लाख टनांची घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यातील ऊसाच्या लागवड आणि उत्पादनात ३०-४० टक्के घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. परिणामी ऊसाला किमान उतारा चांगला मिळावा यासाठी यंदा महिनाभार विलंबाने म्हणजेच १ नोव्हेंबरपासून (२०१२ मध्ये)गळीत हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार राज्यात सध्या खाजगी आणि सहकारी अशा १६६ कारखान्यांमध्ये ऊस गाळप सुरू असून पश्चिम महाराष्ट्र वगळता अन्य भागातील गळीत हंगाम संपला आहे. १६६ साखर कारखान्यांनी आतापर्यंत ४९८.५८ लाख टन उसाचे गाळप केले असून त्यातून ५५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रात अजूनही ७०ते ८० लाख टन ऊस बाकी असून त्यातून साधारणत: १० लाख टन साखरेचे उत्पादन होण्याची अपेक्षा असल्याचे सहकार विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले.
अशा प्रकारे यंदा सुमारे ६५ लाख मेट्रीक टन साखरेचे उत्पादन होण्याची अपेक्षा असली तरी गेल्या तीन-चार वर्षांच्या तुलनेत हे उत्पादन खूपच कमी आहे.