सध्याच्या विपरीत परिस्थितीमध्येही राज्याची अर्थव्यवस्था योग्य दिशेने वाटचाल करत असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते गुरूवारी विधानसभेत राज्यपलांच्या अभिभाषणाला उत्तर देताना बोलत होते. यावेळी फडणवीस यांनी राज्याचा विकास दर आणि उद्योगक्षेत्रात चांगली वृद्धी झाल्याचे सांगितले. राज्याचा आठ टक्के हा विकास दर देशाच्या विकासदरापेक्षाही जास्त आहे. दुसरीकडे उद्योगक्षेत्राचा विकास दरही ४.६ टक्क्यांवरून ६.४ टक्क्यांवर गेल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मात्र, त्याचवेळी राज्यातील कृषी क्षेत्राची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या १५ वर्षात दुष्काळ आणि अन्य नैसर्गिक संकटामुळे कृषी क्षेत्राचा विकास दर सातत्याने खालावत असून सध्या या क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे. राज्य मोठ्या कृषी संकटातून जात आहे. मात्र, या विपरीत परिस्थितीमध्येही लक्ष्य समोर ठेवून काम केल्यास राज्याची प्रगती होऊ शकते, हे आर्थिक पाहणी अहवालातील आकेडवारीवरून दिसून येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
सरकार हे कर्जमाफीच्या विरोधात नाही. मात्र, कर्जमाफी झाल्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती खरच सुधारेल का, याचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे. जोपर्यंत आपली शेती आपल्या वातावरणातील बदलाला अनुकूल होणार नाही तोपर्यंत कृषी क्षेत्राला स्थैर्य मिळणार नाही, असे मत मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केले. सरकार शेतकरी आणि कृषी क्षेत्राची परिस्थिती सुधारण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांना फक्त कर्जमाफी देण्यापेक्षा शेतकऱ्यांना वीज, पाणी आणि सिंचनासारख्या शाश्वत सुविधा पुरविण्यावर सरकारचा भर असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.