शरद पवार यांच्या अभिनंदनाचा ठराव

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २४ जुलैपासून सुरू होणार आहे. ११ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या अधिवेशनात शासकीय कामकाज, विधेयकांबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संसदीय कार्यकालास ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या व अन्य नेत्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव विधिमंडळात मांडण्यात येणार असल्याची माहिती संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी दिली.

कामकाज सल्लागार समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या वेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ  बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी उपस्थित होते.

तीन आठवडे चालणाऱ्या या अधिवेशनात ५ ऑगस्ट रोजी एक विशेष ठराव मांडण्यात येणार आहे. इंदिरा गांधी, दीनदयाळ उपाध्याय, बाळासाहेब देसाई यांच्याबरोबरच शरद पवार आणि आमदार गणपतराव देशमुख यांच्या संसदीय कारकीर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल हा विशेष ठराव मांडण्यात येणार असून त्या दिवशी अन्य कोणतेही कामकाज नसेल.