News Flash

सहा खासदार, २१ आमदार लवकरच निवृत्त

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघांतील इच्छुकांनी नगरसेवकांना ‘वश’ करण्यावर भर दिला आहे.

डॉ. सावंत, पोटे, तटकरे, ठाकरे यांचा समावेश

पुढील वर्षांत राज्यसभेचे सहा खासदार आणि विधान परिषदेच्या २१ आमदारांची मुदत संपत असून, निवडणुकांना अद्याप काही कालावधी असला तरी इच्छुकांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघांतील इच्छुकांनी नगरसेवकांना ‘वश’ करण्यावर भर दिला आहे.

आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे राज्यमंत्री प्रवीण पोटे यांच्यासह विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये समावेश आहे. राज्यसभेच्या सहा खासदारांची मुदत एप्रिलमध्ये संपुष्टात येत आहे. विधान परिषदेचे विधानसभा सदस्यांमधून निवडून येणारे ११ सदस्य, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील प्रत्येकी दोन, स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील सहा सदस्य निवृत्त होत आहेत.

सहा खासदार निवृत्त

राज्यसभेचे वंदना चव्हाण आणि डी. पी. त्रिपाठी (राष्ट्रवादी), रजनी पाटील आणि राजीव शुक्ला (काँग्रेस), अनिल देसाई (शिवसेना), अजयकुमार संचेती (भाजप) हे सहा सदस्य निवृत्त होत आहेत. राज्यसभेवर निवडून येण्याकरिता पहिल्या पसंतीच्या ४२ मतांची आवश्यकता आहे. सदस्यसंख्येनुसार भाजपचे तीन, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक सदस्य निवडून येऊ शकतो. शिवसेनेकडे २१ मते अतिरिक्त असली तरी शिवसेना दुसरा उमेदवार उभा करण्याचे धाडस करेल का, यावर बरेच अवलंबून असेल.

११ जागांसाठी चुरस

विधानसभेतून निवडून येणाऱ्या ११ सदस्यांसाठी चुरस होण्याची चिन्हे आहेत. निवडून येण्याकरिता पहिल्या पसंतीच्या २७ मतांची आवश्यकता आहे. भाजपचे १२२ आमदार असून, छोटे पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने पाचवी जागा निवडून आणण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. शिवसेनेचे दोन तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे एकत्रित तीन उमेदवार निवडून येऊ शकतात. पाचवी जागा निवडून आणण्याकरिता भाजपला १३५ मतांची आवश्यकता भासेल. पाचव्या जागेकरिता भाजपकडून आर्थिकदृष्टय़ा तगडय़ा उमेदवाराला उतरविले जाईल, अशी शक्यता आहे. दोन वर्षांपूर्वी आघाडीत राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारांना काँग्रेसने पाठिंबा दिला होता. यंदा काँग्रेसच्या दोन उमेदवारांना राष्ट्रवादीने पाठिंबा द्यावा, असे ठरले आहे. हे आश्वासन कसे पाळले जाते यावर आघाडीच्या तिसऱ्या उमेदवाराचे भवितव्य ठरणार आहे.

स्थानिक प्राधिकारीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीची कसोटी

नाशिक, लातूर-उस्मानाबाद-बीड, परभणी-हिंगोली, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, अमरावती, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या सहा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणूक होत आहे. गेल्या वर्षी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकांमध्ये राजकीय संदर्भ बदलले आहेत. भाजपचे संख्याबळ वाढल्याने या निवडणुकीत भाजपला चांगल्या जागा मिळू शकतात. अर्थात या मतदारसंघांच्या निवडणुका पैशाच्या जोरावर जिंकता येतात.

हे आमदार निवृत्त होणार

सुनील तटकरे, जयदेव गायकवाड, नरेंद्र पाटील, अमरसिंह पंडित, निरंजन डावखरे, जयंत जाधव, बाबाजानी दुर्राणी, अनिल तटकरे (राष्ट्रवादी), माणिकराव ठाकरे, संजय दत्त, शरद रणपिसे, दिलीप देशमुख (काँग्रेस), भाई गिरकर, महादेव जानकर, प्रवीण पोटे, मितेश भांगडिया (भाजप), अनिल परब आणि डॉ. दीपक सावंत (शिवसेना), कपिल पाटील (लोकभारती), जयंत पाटील (शेकाप), अपूर्व हिरे (अपक्ष) असे २१ आमदार निवृत्त होत आहेत.

राष्ट्रवादीचे सर्वाधिक सदस्य

निवृत्त होणाऱ्या २१ सदस्यांमध्ये सर्वाधिक आठ सदस्य हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. काँग्रेस आणि भाजपचे प्रत्येकी चार सदस्य निवृत्त होत आहेत. शिवसेना (दोन), शेकाप, लोकभारती आणि अपक्ष प्रत्येकी एक सदस्य निवृत्त होत आहेत. बदलत्या राजकीय परिस्थितीत भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून येतील.

  • रायगडमधील शेकापचे नेते जयंत पाटील यांनी लागोपाठ दोन निवडणुकांमध्ये पक्षाकडे दोन किंवा तीनपेक्षा जास्त मते नसतानाही ११वा उमेदवार म्हणून विजय प्राप्त केला होता. सर्व राजकीय पक्षांमध्ये असलेल्या सलोख्याच्या संबंधामुळेच जयंत पाटील यांना विजय मिळविणे शक्य झाले होते. गुप्त मतदानात मतांची फोडाफोड करून जयंत पाटील पुन्हा चमत्कार करणार का, असा प्रश्न आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2017 3:42 am

Web Title: maharashtra legislative council 21 mla term expired
Next Stories
1 पहिल्या देशी बनावटीच्या विमानावर अखेर शिक्कामोर्तब
2 कोकण रेल्वेच्या पारदर्शक डब्याला भरघोस प्रतिसाद
3 ‘मराठी भाषा’ रुळावरून घसरली!
Just Now!
X