राष्ट्रकुल संसदीय मंडळाचा दोन आठवडय़ांचा दौरा
राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या अभ्यास दौऱ्यानिमित्त विधिमंडळातील जवळपास २० ते २५ आमदार १४ दिवसांच्या सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडच्या गारेगार दौऱ्यावर जाणार आहेत.
राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेतर्फे हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. प्रत्येक राजकीय पक्षाच्या संख्याबळानुसार त्यांना या दौऱ्यासाठी आपापल्या पक्षाच्या आमदारांची नावे सुचवण्यास सांगण्यात आले आहे. सर्वपक्षीय २० ते २५ आमदार या दौऱ्यात सहभागी होतील. मुंबईतून सिंगापूर व तेथून ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड असा हा दोन आठवडय़ांचा हा दौरा असणार आहे. या दौऱ्यात तेथील संसदेला भेट, तेथील पदाधिकारी, नेते यांच्याशी चर्चा व त्याचबरोबर विकास प्रकल्पांना आणि पर्यटनस्थळांना भेट असे या दौऱ्याचे स्वरूप आहे, असे सांगण्यात आले.
हा परदेश दौरा पूर्णपणे सरकारी खर्चातून होत नाही. या दौऱ्यातील खर्चाचा काही वाटा आमदारांनाही उचलावा लागतो. त्याचबरोबर ज्या आमदारांना आपल्या कुटुंबातील सदस्यांना दौऱ्यात आणायचे असेल त्यांना कुटुंबातील सदस्याचा संपूर्ण खर्च उचलावा लागतो.
या दौऱ्यानंतर आणखी एक दौरा युरोपीय देशांचा होणार असून त्यासाठी आमदारांची दुसरी तुकडी निवडण्यात येतील. प्रत्येक पक्षाच्या प्रतोदांकडून त्यासाठी आमदारांची यादी मागवली जाते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 1, 2018 4:22 am