News Flash

वर्सोव्याच्या समुद्रकिनारी ‘मियामी’सारखे मनोरंजन क्षेत्र

गणेश विर्सजन स्थळापासून सागर कुटीर ते जुहूच्या मोरा गावापर्यंत हे मनोरंजन क्षेत्र तयार केले जाणार आहे.

वर्सोव्याच्या समुद्रकिनारी ‘मियामी’सारखे मनोरंजन क्षेत्र
प्रतिनिधिक छायाचित्र

सागरी क्रीडाप्रकारांसह, मैदानी खेळांसाठीही सुविधा

जगभरातील पर्यटकांचे आकर्षणाचे स्थळ असणाऱ्या अमेरिकेतील मियामी बीचच्या धर्तीवर वर्सोवा समुद्रकिनारा विकसित करण्याचा उपक्रम महाराष्ट्र सागरी मंडळाने हाती घेतला आहे. या योजनेअंतर्गत वर्सोवा किनाऱ्यावर ‘सागरी मनोरंजन क्षेत्र’ उभारण्यात येणार असून वॉटर स्पोर्ट्स, शॅक्स, कॅफे याशिवाय क्रिकेट, कबड्डी, व्हॉलीबॉलसारख्या खेळांच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

वर्सोवा किनारा स्वच्छतेसाठी मागील ९५ आठवडय़ापासून रहिवाशांतर्फे  मोहिमेचे आयोजन केले जात आहे. वर्सोवा किनारा कचरामुक्त  करण्याचे आवाहन प्रशासनापुढे असताना महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे या ठिकाणी सागरी मनोरंजन क्षेत्र उभारण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. स्थानिक आमदार अमित साटम यांनी तयार केलेल्या सागरी मनोरंजन आराखडय़ाला सागरी मंडळाने मान्यता दिली असून येत्या पंधरा दिवसांत यासाठी निविदा मागवण्यात येणार आहेत.

गणेश विर्सजन स्थळापासून सागर कुटीर ते जुहूच्या मोरा गावापर्यंत हे मनोरंजन क्षेत्र तयार केले जाणार आहे. अमेरिकेतील मियामी किनाऱ्याच्या पाश्र्वभूमीवर या मनोरंजन क्षेत्रात जेट स्की, बोट राइड, पॅरासेलिंग, बनाना राईड या सागरी खेळांसाठी सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. त्यासोबतच क्रिकेट, कबड्डी, व्हॉलीबॉल, फुटबॉल अशा मैदानी खेळांसाठीही येथे जागा उपलब्ध करून दिली जाईल. याशिवाय खरेदी तसेच खाद्यपदार्थाची दुकानेही येथे उभारण्यात येणार आहेत. वर्सोवा ते जुहू दरम्यान पर्यटकांच्या सोयीसाठी लाकडी फळ्याचे ‘बोर्ड वॉक’ही तयार केले जाणार आहे. वर्सोवा किनारा हा पर्यटन, मनोरंजन आणि फिरण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. या ठिकाणी जर आंतरराष्ट्रीय दर्जाचा समुद्रकिनारा निर्माण झाल्यास, वर्सोवा किनारा महत्त्वाचे पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाईल आणि त्यामुळे रोजगार ही निर्माण होईल.

‘अन्य किनाऱ्यांवरही सुविधा’

वर्सोवा किनाऱ्यावरील १० एकर जमिनीची मालकी महाराष्ट्र सागरी मंडळाची असून उपक्रमासाठी लागणाऱ्या जमिनीची मोजणी अधिकाऱ्याकडून सुरू असल्याची माहिती महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पाटणे यांनी दिली. या शिवाय या ठिकाणी ज्या दुकानधारकांना जागा दिली जाईल, त्यांनाच किनाऱ्याची स्वच्छता करणे बंधनकारक असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. वर्सोवा किनाऱ्याबरोबरच मुंबईतील इतर किनाऱ्यावर या प्रकारचा उपक्रम राबवण्याचा मंडळाचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, मनोरंजन क्षेत्रापेक्षा वर्सोवा किनारा स्वच्छ करण्यासाठी व समुद्रातील प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना राबविणे गरजेचे असल्याचे मत वर्सोवा किनारा स्वच्छता मोहिमेचे प्रणेते अफरोज शहा यांनी मांडले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2017 2:28 am

Web Title: maharashtra marine board to develop recreation area at versova beaches
Next Stories
1 खंडग्रास चंद्रग्रहण सोमवारी
2 पोलीस वसाहतीतून पिस्तुलाची चोरी
3 ‘जियो पारसी’ मोहिमेला यश 
Just Now!
X