राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. याप्रकरणी ते स्वत: राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेणार असून सखोल चौकशीची मागणी करणार आहेत. आव्हाडांनी ट्विट करत याची माहिती दिली. ‘कोणत्याच नवोदित कलाकारांसोबत अशा प्रकारचा छळ होऊ नये’, असंही त्यांनी ट्विटरवर म्हटलंय.

सुशांतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर बॉलिवूडमधली घराणेशाहीवरून नवा वाद निर्माण झाला आहे. बॉलिवूडमधल्या एका विशिष्ट उच्च वर्गाने सुशांतवर बंदी आणली होती असं म्हटलं जात आहे. या प्रकरणावर ट्विट करत आव्हाड म्हणाले, “मला असं वाटतं की सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी सखोल चौकशी झाली पाहिजे. आपण एका प्रतिभावान अभिनेत्याला गमावलोय, जो बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करण्यासाठी पाटणाहून आला होता. ज्या काही कथा ऐकायला मिळत आहेत, त्या खूप भयानक आहेत. कोणत्याही नवोदित कलाकारासोबत अशा प्रकारचा छळ नाही झाला पाहिजे.”

जितेंद्र आव्हाड यांनी आणखी एक ट्विट करत काही प्रश्न उपस्थित केले. “मी स्वत: गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन चौकशीची मागणी करणार आहे. सत्य लोकांसमोर आलं पाहिजे. त्याच्या चित्रपटांना रोखलं गेलं होतं का? त्याच्या चित्रपटांवर बंदी आणली होती का? काही चित्रपटांमधून जबरदस्ती त्याला काढून टाकण्यात आलं होतं का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आणि त्यामुळे शंका उपस्थित होत आहे.”

सुशांत सिंह राजपूतने रविवारी (१४ जून) मुंबईतील वांद्रे इथल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही.