उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप विरोधकांनी केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर देसाई यांनी आज सकाळी फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर त्यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा सोपवला. पण त्यांनी तो स्वीकारला नाही. देसाई यांनीच ही माहिती माध्यमांना दिली.

देसाई हे नैतिकतेच्या मुद्द्यावर लवकरच पायउतार होतील, असे संकेत देण्यात आले होते. मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची सूचना करून पक्षकार्याची जबाबदारी त्यांच्यावर दिली जाईल, असे सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले होते. घोटाळ्याच्या आरोपांनंतर मुख्यमंत्र्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर सुभाष देसाई यांनी काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशी सुरु असताना कोणत्याही पदावर राहणारा शिवसैनिक नाही, असे त्यांनी ठाकरे यांना सांगितले होते. उद्या मी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राजीनामा देईन, असेही ते म्हणाले होते. त्यानुसार आज देसाईंनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर नैतिकतेच्या मुद्द्यावरून त्यांच्याकडे राजीनामा सोपवला. पण त्याची काहीही आवश्यकता नाही, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा स्वीकारण्यास नकार दिला. देसाई यांनी स्वतःच ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली.

घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. चौकशी सुरु असताना त्या पदावर राहू नये, असे मला वाटले. म्हणून मी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला. पण राजीनामा देण्याची गरज नाही, असे मुख्यमंत्र्यांनी मला सांगितले आणि तो स्वीकारण्यास नकार दिला. या प्रकरणी होणाऱ्या चौकशीला मी संपूर्ण सहकार्य करणार आहे. चौकशीअंती जे समोर येईल. त्यानंतर जो निर्णय घेतला जाईल तो मला मान्य असेल, अशी प्रतिक्रिया देसाई यांनी दिली.