मुंबईत सोमवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. मुंबईतील आकाशवाणी समोर असलेले आमदार निवास बॉम्बनं उडवून देण्याच्या धमकीचा एक फोन आला. त्यानंतर पोलीस आणि बॉम्ब स्क्वाड यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. सुरक्षेच्या कारणास्तव करण्यात आलेल्या शोध मोहिमेममध्ये बॉम्ब सापडला नसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, शोध मोहिमेनंतर हा फोन दिशाभूल करणारा असल्याची माहिती समोर आली.

सोमवारी रात्री ११ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास मुंबईतील आकाशवाणी समोर असलेल्या आमदार निवासाला अज्ञात क्रमांकावरून बॉम्बनं उडवून देण्याची धमकी आली. या घटनेची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या. यानंतर श्वानपथक, बॉम्ब स्क्वाड आणि पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आमदार निवासात वास्तव्यास असलेल्या सर्वांना त्वरित बाहेर काढून इमारत रिकामी केली. तब्बल दोन तास सुरू असलेल्या शोधमोहिमेनंतर ही दिशाभूल करणारा कॉल असल्याची माहिती उघड झाली.

दरम्यान, पोलिसांनी आमदार निवासात कॉल करून धमकी देणाऱ्या व्यक्तीचा नंतर शोधला असून त्याचा तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, यावर लवकारत लवकर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थानही उडवून देण्याची धमकी आली होती.