भाजप नेते प्रमोद जठार यांचा आरोप

जाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाला राजकीय विरोध करणाऱ्या मंडळींचेच गणगोत या प्रकल्पाच्या परिसरातील स्थानिकांच्या जमिनीबाहेरील धनिकांना मिळवून देण्याच्या व्यवहारात गुंतलेले होते, असा गौप्यस्फोट भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत केला.

एक तर हा प्रकल्प वाईट असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पटवून द्यावे किंवा प्रकल्प चांगला असल्याचे पटवून घ्यावे. उगाच कोकणातील वातावरण खराब करू नये, असा टोलाही जठार यांनी शिवसेना नेते उद्धव ठाकरे व खासदार नारायण राणे यांना लगावला.

शिवसेना आणि नारायण राणे हे नाणार प्रकल्पाला विरोध करत आहेत. दोघेही भाजपचे सहकारी पक्ष या नात्याने सत्तेत भागीदार आहेत. त्यामुळे या दोघांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी संवाद साधणे सहज शक्य आहे. हा प्रकल्प वाईट असल्याचे या दोघांनी मुख्यमंत्र्यांना पटवून द्यावे किंवा प्रकल्प चांगला असल्याचे पटवून घ्यावे आणि ते कबूल करावे. या प्रकल्पावरून उगाच स्थानिकांच्या मनात गैरसमज तयार करून कोकणातील वातावरण खराब करू नये, असे जठार म्हणाले.

विजयदुर्ग येथे समुद्राची खोली १९ मीटरपेक्षा जास्त असल्याने तेथे मोठे बंदर व्हावे अशी मागणी आम्ही केंद्रीय बंदर विकासमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. त्यांनी ती मान्य केली. त्याच सुमारास अरब देशांतून कच्चे तेल आयात करणे सुलभ होईल अशा पश्चिम किनारपट्टीवरील ठिकाणाचा शोध सुरू होता. विजयदुर्गला मोठे बंदर होतच आहे तर त्याच्याच जवळपास जागा असल्यास चांगले होईल या विचारातून गुहागर आणि नाणार या दोन जागांची पाहणी झाली. पैकी नाणारवर शिक्कामोर्तब झाले, अशी माहितीही जठार यांनी दिली.

कोकणात प्रकल्प येत असेल तर स्थानिकांना सुविधा मिळायला हव्यात या दृष्टिकोनातून आम्ही एक अहवाल मुख्यमंत्री फडणवीस यांना दिला आहे. त्यात जमिनीला प्रति हेक्टरी एक कोटी रुपये दर द्यावा, प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या कोकणवासीयांना प्रकल्पाचे समभाग देऊन त्यांना प्रकल्पात भागीदार करून घ्यावे, नाणार परिसरात एक परिपूर्ण स्मार्ट सिटी उभी करावी, नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या धर्तीवर दर्जेदार रुग्णालय राजापूरमध्ये उभारण्यात यावे, अशी मागणी आम्ही केली आहे.

कोकण विकासाची उंची समुद्राच्या खोलीवर अवलंबून

समुद्र हा कोकणच्या विकासाचा मार्ग आहे. समुद्राची खोली जितकी जास्त तितके मोठे व चांगले बंदर आणि मोठय़ा जहाजांची ये-जा शक्य होते. मुंबई, जेएनपीटीपेक्षाही कोकणात समुद्राची खोली जास्त आहे. विजयदुर्गमध्ये ती १९ मीटर इतकी आहे. त्यामुळे कोकणच्या विकासाची उंची ही समुद्राच्या खोलीवर अवलंबून आहे, असेही प्रमोद जठार यांनी नमूद केले.