आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) माघार घेतली आहे. पक्षाचे नेते शिरिष सावंत यांनी ही अधिकृत माहिती दिली आहे. या निर्णयानंतर १९ मार्च रोजी होणाऱ्या मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात याबाबत पक्ष प्रमुख राज ठाकरे हे सविस्तर संबोधन करतील, असेही सावंत यांनी म्हटले आहे. दरम्यान, मनसे राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याच्या तयारीत आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दरम्यान, मुंबईत ९ मार्चला झालेल्या मनसेच्या १३ व्या वर्धापन दिनी राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकांबाबत नंतर बोलेन असं म्हणत सस्पेन्स कायम ठेवला होता. हा सस्पेन्स आता संपला असून मनसे यंदाची सार्वत्रिक लोकसभा निवडणूक लढवणार नाही यावर शिक्कामोर्तब झालं आहे. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १९ मार्चला मुंबईत पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आल्याचे म्हटले होते. या मेळाव्यात ते मोठी घोषणा करतील असे बोलले जात होते. मात्र, आता या मेळाव्यात राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देऊन नरेंद्र मोदींविरोधात प्रचार करण्याची चिन्हं आहेत.