News Flash

‘महाराष्ट्राला बुलेट ट्रेनची नव्हे, पाण्याची गरज’

देशासाठी सिंचनाकरिता दर वर्षी १ लाख कोटी रुपयांची तरतूद करायला हवी

| March 16, 2016 04:11 am

पृथ्वीराज चव्हाण

 

महाराष्ट्रात सध्या पाण्याचे संकट मोठे आहे, त्यासाठी निधीची आवश्यकता आहे, बुलेट ट्रेनची नाही, असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. बुलेट ट्रेनला आपला कडाडून विरोध राहील, असेही त्यांनी ठणकावले.

विधान भवनात मंगळवारी पृथ्वीराज चव्हाण व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा वार्तालाप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी चव्हाण यांनी केंद्र सरकारच्या चालू अर्थसंकल्पातील सिंचनावर केलेल्या तरतुदीचा समाचार घेतला. रस्ते, रेल्वे, यांसाठी मोठी तरतूद केली, परंतु शेतीसाठी सिंचन ही पायाभूत सुविधा केंद्र सरकार मानते की नाही, असा सवाल त्यांनी केला. देशातील सर्व राज्यांसाठी सिंचनाकरिता फक्त ५७०० कोटी रुपयांची तरतूद केल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. एवढय़ा तुटपुंज्या निधीने काय होणार आहे, देशासाठी सिंचनाकरिता दर वर्षी १ लाख कोटी रुपयांची तरतूद करायला हवी, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात विशेषत: मराठवाडय़ात पाण्याचे भीषण संकट आहे. पाण्याची समस्या सोडविण्याऐवजी बुलेट ट्रेन सुरू करण्याचे घाटत आहे. मुंबईला मेट्रो ट्रेन, उन्नत रेल्वे मार्ग, यांची गरज आहे, परंतु बुलेट ट्रेनची आवश्यकता नाही, आपला त्याला तीव्र विरोध राहील, असे त्यांनी सांगितले. मुंबईतील मोनो रेल्वेचा प्रकल्प चुकला, अशी कबुलीही त्यांनी दिली.

आपण मुख्यमंत्री असताना, सिंचन स्थितीवर श्वेतपत्रिका काढली, ती राज्यातील जनतेला वस्तुस्थिती कळावी म्हणून, कुणाला तरी लक्ष्य करण्यासाठी म्हणून नव्हे, तरीही मी चौकशी लावली, असा आरोप माझ्यावर झाला, अशी अस्वस्थताही त्यांनी बोलून दाखविली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2016 4:11 am

Web Title: maharashtra need water not bullet train
टॅग : Maharashtra
Next Stories
1 विजयादशमीच्या उत्सवापासून संघ स्वयंसेवक नव्या गणवेशात
2 स्वयंचलित लॉक प्रणाली तोडण्याचा ‘कार’नामा
3 प्रवासाचे ‘इंटरसिटी’ पर्व एका तपाचे!
Just Now!
X