‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणे महाराष्ट्राची गरज,’ अशा आशयाचे पोस्टर मातोश्रीच्या परिसरात झळकले आहेत. एकीकडे शिवसेना-भाजपामध्ये मुख्यमंत्रीमंत्रीपदावरून कलगीतुरा सुरू असताना असे पोस्टर झळकल्यामुळे शिवसैनिक आणि राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आलं आहे. विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर वरळीमध्ये आदित्य ठाकरे हे भावी मुख्यमंत्री आहेत, अशा आशयाचे बॅनर्स झळकले होते.

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणे महाराष्ट्राची गरज अशा आशयाचे पोस्टर मातोश्रीच्या परिसरात लागले आहेत. शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा ही शिवसैनिकांची इच्छा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री होणे ही महाराष्ट्राची गरज आहे अशी शिवसैनिकांची इच्छा आहे असे बॅनर लिहण्यात आलं आहे.

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला असला तरी राज्यात अद्याप सत्ता स्थापन झालेली नाही. राज्यातील जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे. असं असलं तरी ५०-५० सुत्रामुळे भाजपा आणि शिवसेनेमध्ये सत्ता स्थापनेचे तिढा सुटलेला नाही. एक शिवसैनिकच मुख्यमंत्री होईल असं वचन आपण बाळासाहेब ठाकरेंना दिल्याचे वक्तव्य शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीपूर्वीच्या एका भाषणात केले होते.