मुंबईच्या वाहतुकीसाठी महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सागरी किनारी मार्गाचा आराखडा आता नव्याने करण्यात येणार आहे. नेदरलॅण्ड आणि राज्य सरकार यांच्यात शनिवारी सामंजस्य करार झाला. त्यानुसार दोन वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेला या प्रकल्पाचा आराखडा रद्द करण्यात आला असून डच कंपनीच्या मदतीने तीन महिन्यात नवीन आराखडा तयार करण्यात येणार आहे. ३५ किमी लांबीच्या या सागरी किनारा मार्गावर मेट्रो, बाग बगीचे उभारण्यात येणार आहेत.
हा सामंजस्य करार मुंबईच्या विकासासाठी पुढचे पाऊल असेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच सागरी मार्ग पर्यावरण पूरक ठरेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. नरिमन  पॉईंट ते कांदीवली या दरम्यान समुद्रात भराव टाकून उभारण्यात येणाऱ्या सागरी मार्गाकरिता नेदरलॅण्डचे पंतप्रधान मार्क रुट आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हॉटेल ताजमहाल येथे याबाबतचा सामंजस्य करार करण्यात आला.  या प्रकल्पाचा आराखडा दोन वर्षांपूर्वी तयार करण्यात आला होता. त्यावेळी प्रकल्पासाठी सुमारे नऊ हजार कोटींचा खर्च अपेक्षीत होता. मात्र आता नव्याने आराखडा तयार करण्यात येईल. एकात्मिक प्रकल्पाचा आराखडा हॉलंडमधील जागतिक दर्जाचे तज्ञांच्या मदतीने तयार केला जाणार आहे. समुद्री जल व्यवस्थापन आणि पाण्यात बांधकाम उभारण्यात जगात डच कंपन्यांचा हातखंड आहे. त्यामुळे सागरी किनारा मार्गाच्या उभारणीत डच तज्ञांचे मार्गदर्शन आणि सहकार्य घेण्यात येत असल्याचेही  फडणवीस यांनी सांगितले.