महाराष्ट्राचा उद्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल असे सांगत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपविरोधात उघडपणे दंड थोपटले आहेत. ते गुरूवारी मुंबईत बोलत होते. थोडीफार सत्ता हाती येऊनही शिवसेना कशाप्रकारे काम करत आहे, हे तुम्ही बघत आहात. त्यामुळे उद्या जर शिवसेनेच्या हाती पूर्ण सत्ता आली तर शिवसेना कशाप्रकारे काम करेल, याची कल्पना तुम्ही करू शकता. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री आणणे हे आपले स्वप्न आहे आणि उद्याचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल, असा ठाम विश्वास उद्धव यांनी व्यक्त केला. याशिवाय, शिवसेनाचा मुख्यमंत्री उगाच इकडे तिकडे न फिरता केवळ महाराष्ट्रात फिरेल, असे सांगत उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांना टोलाही लगावला. यंदाचा मराठवाड्यातील दुष्काळ गेल्या वर्षीपेक्षा मोठा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. उद्धव यांनी काही दिवसांपूर्वीच मराठवाडय़ातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केला होता. या दौऱ्यानंतर सरकारवर टीका करताना उद्धव यांनी सरकारने दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मंजूर केलेला निधी दुष्काळग्रस्तांच्या हाती पडतच नसल्याने हा पैसा नेमका कुणाकडे जातो अशी शंका उपस्थित केली होती.