महाराष्ट्राच्या सेवेतील सात सनदी अधिकारी केंद्रात सचिवपदी पात्र ठरले असले तरी केंद्र सरकारने केलेल्या फेरबदलांमध्ये राज्यातील एकाही अधिकाऱ्याची सचिवपदी नियुक्ती झालेली नाही. परिणामी राज्यातील एकच अधिकारी केंद्रात सचिवपदी असून, या अधिकाऱ्याकडे तुलनेत दुय्यम दर्जाचे पद आहे.

वाय. एस. सुखटणकर, डी. एस. जोशी, एस. राजगोपाल आणि भालचंद्र देशमुख या महाराष्ट्राच्या सेवेतील चार अधिकाऱ्यांनी कॅबिनेट सचिव हे प्रशासकीय सेवेतील सर्वोच्चपद, तर राम प्रधान आणि माधव गोडबोले यांनी गृह सचिवपद भूषविले आहे. केंद्रात महाराष्ट्र कॅडेरच्या अधिकाऱ्यांची अशी उज्ज्वल परंपरा असली तरी सध्या मात्र केंद्राच्या सेवेतील राज्याचे महत्त्व कमी झाले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यातील मंत्र्यांकडे महत्त्वाची खाती असली तरी प्रशासकीय आणि पोलीस सेवेत मात्र महाराष्ट्राची कामगिरी फार काही चांगली नाही. केंद्र सरकारने बुधवारी १६ सचिवांच्या बदल्या केल्या किंवा काही जणांची नव्याने नियुक्ती केली. राज्यातील सात अधिकारी सचिवपदासाठी पात्र ठरले आहेत. पण एकाही अधिकाऱ्याला नव्या नियुक्तीत स्थान मिळालेले नाही.

संजीवनी कुट्टी या राज्यातील एकमेव अधिकारी केंद्रात सचिवपदी आहेत. सध्या त्या गृह मंत्रालयात सीमा सुरक्षा विभागाच्या सचिव असल्या तरी त्यांची १ ऑगस्टपासून संरक्षण विभागात माजी सैनिक कल्याण विभागाच्या सचिवपदी बदली करण्यात आली आहे.

जहाज मंत्रालयाच्या संचालिका मालिनी शंकर आणि ‘आधार’ यू.आय.डी.ए.चे संचालक अजय भूषण पांडे या महाराष्ट्रातील सनदी अधिकाऱ्यांना नव्या रचनेत विशेष सचिव म्हणून दर्जा देण्यात आला आहे. अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) सुधीर श्रीवास्तव, मुंबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता, मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाचे आयुक्त यू.पी.एस. मदान, वित्त सचिव डी. के. जैन, जहाज मंत्रालयाच्या संचालिका मालिनी शंकर, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया हे अधिकारी केंद्रात सचिवपदाकरिता पात्र ठरले आहेत. यापैकी भाटिया आणि मालिनी शंकर हे केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत. मालिनी शंकर यांना निवृत्तीस दीड वर्षांचा कालावधी शिल्लक असल्याने त्यांना बहुधा विशेष सचिवपदाचा दर्जा देण्यात आला असावा, असे बोलले जाते.

राज्यातील अधिकारी केंद्रात प्रतिनियुक्तीवर जाण्यास फारसे तयार नसतात. केंद्रात सचिवपदी नियुक्ती करताना त्यांनी केंद्रात आधी काम केले असल्यास त्यांना प्राधान्य मिळते.  ‘महाराष्ट्र केसरी’पेक्षा ‘हिंद केसरी’ ही केंद्रात महत्त्वाची ठरते, अशी मार्मिक प्रतिक्रिया एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली.