News Flash

‘त्या’ डॉक्टरांवरही कारवाई हवी

‘कट प्रॅक्टिस’ला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र राज्य पॅथॉलॉजी असोसिएशनची मागणी

‘त्या’ डॉक्टरांवरही कारवाई हवी
( प्रतिकात्मक छायाचित्र )

‘कट प्रॅक्टिस’ला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र राज्य पॅथॉलॉजी असोसिएशनची मागणी

वैद्यकीय क्षेत्रातील ‘कट प्रॅक्टिस’ला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने तयार केलेल्या ‘कट प्रॅक्टिस’ कायद्याच्या मसुद्यात अनधिकृत पॅथॉलॉजीकडे रुग्णांना पाठविणाऱ्या डॉक्टरांचा समावेश करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य पॅथॉलॉजी असोसिएशनने केली आहे.

पॅथॉलॉजीचे शिक्षण न घेता केवळ तंत्रज्ञाचे शिक्षण घेऊन पॅथॉलॉजी चालविणाऱ्या केंद्रांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा प्रकारे अनधिकृत पॅथॉलॉजीवर सरकारचे नियंत्रण नाही. येथे तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांकडून जादा पैसे आकारले जातात आणि यातील काही वाटा डॉक्टरांना दिला जातो, असा आरोप राज्य पॅथॉलॉजी असोसिएशनने केला आहे. हादेखील कट प्रॅक्टिसचा एक प्रकार असून अशा अनधिकृत पॅथॉलॉजीकडे पाठविणाऱ्या डॉक्टरांचा कट प्रॅक्टिस कायद्याअंतर्गत समावेश करावा, अशी मागणी राज्य पॅथॉलॉजी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संदीप यादव यांनी केली आहे.

कट प्रॅक्टिस कायद्याचा मसुदा अंतिम टप्प्यात आहे. काही दिवसांपूर्वी कट प्रॅक्टिस कायद्याच्या मसुद्यात वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सूचनांचा समावेश करण्यात आला आहे. पॅथॉलॉजीमध्ये दररोज हजारो रुग्णांची रक्त, मूत्र आदी तपासणी केल्या जातात. या तपासणीतून आलेल्या अहवालातून आजाराचे निदान झाल्यानंतर उपचार सुरू होतात. रुग्णांच्या संबंधितचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारने कट प्रॅक्टिस मसुद्यात सुधारणा करावी, असे राज्य पॅथॉलॉजी असोसिएशनचे डॉ. प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले. राज्यामध्ये सध्या तीन ते पाच हजार अनधिकृत पॅथॉलॉजी असून, त्यातील ६० ते ७० टक्के या शहरी भागात आहेत.

गेल्या १० वर्षांपासून अनधिकृत पॅथॉलॉजीवर कारवाई केली जावी, अशी मागणी केली जात आहे, मात्र सरकारकडून याबाबत कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही. इंडियन मेडिकल कौन्सिल आणि महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर या कायद्यानुसार पॅथॉलॉजिस्टचे शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांना पॅथॉलॉजी चालविण्याचा अधिकार आहे. मात्र तरीही अनेक पॅथॉलॉजीमध्ये तंत्रज्ञ पॅथॉलॉजी चालवितात, हा या क्षेत्रातील गंभीर प्रश्न आहे, असे डॉ. यादव यांनी सांगितले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2017 2:17 am

Web Title: maharashtra pathology association comment on doctors cut practice scam
Next Stories
1 बनावट नोटांचे सीमेपलीकडील छापखाने पुन्हा सुरू?
2 गोरेगावच्या सिद्धार्थ रुग्णालयात डॉक्टर तरुणीची आत्महत्या
3 पोलिसांना अद्याप ‘बुलेटप्रूफ जॅकेट’ची प्रतीक्षा!
Just Now!
X