पुनर्वापर आणि पुर्नप्रक्रिया होणाऱ्या डब्यांच्या वापर करणार!

प्लास्टिकबंदीमुळे खाद्यपदार्थाकरिता वापरल्या जाणाऱ्या हलक्या प्रतीच्या (एकदा वापरून टाकून देण्याजोग्या) प्लास्टिकच्या डब्यांवर बंदी आल्याने त्याचा चांगलाच फटका घरपोच खाद्यपदार्थ सेवा देणाऱ्या हॉटेल व खाद्यपदार्थ विक्रेत्यांना बसत आहे. गेल्या तीन महिन्यात त्यांचा व्यवसाय सुमारे ३० टक्क्य़ांनी कमी झाल्याचे उपाहारगृह चालकांचे म्हणणे आहे. हे नुकसान टाळण्याकरिता जुन्या हलक्या प्रतीच्या प्लास्टिकच्या डब्यांना पर्याय म्हणून पुनर्वापर आणि पुर्नप्रक्रिया होणाऱ्या प्लास्टिकच्या डब्यांच्या वापर करण्याचा निर्णय ‘इंडियन हॉटेल अ‍ॅण्ड रेस्टॉरन्ट असोसिएशन’(आहार) या उपाहारगृह व्यावसायिकांच्या संघटनेने घेतला आहे.

या डब्यांच्या खरेदीसाठी होणाऱ्या अधिकच्या खर्चाची वसुली खवय्यांच्या खिशातूनच करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक पदार्थाच्या किमतीला डब्याच्या खर्च जोडला जाणार आहे. हे पुनर्वापर आणि पुर्नप्रक्रिया करण्याजोगे प्लास्टिकचे डबे संबंधित उपाहारगृहांना परत केल्यास त्यासाठी मोजलेल्या अधिकच्या पैशांच्या परतावा ग्राहकांना करण्यात येणार असल्याचा निर्णय असोसिएशनकडून घेण्यात आला आहे.

उपाहारगृह मालकांच्या ‘आहार’ या संस्थेचे मुंबईत आठ हजार सदस्य असून उपाहारगृहांशी निगडित असणाऱ्या महाराष्ट्रातील ६३ संघटना त्यांच्याशी संलग्न आहेत. प्लास्टिकबंदीच्या निर्णयाच्या घोषणेपासून मागील तीन महिन्यांमध्ये उपाहारगृहांचा घरपोच पदार्थ पोहोचविण्याचा व्यवसाय डबघाईला आल्याचा दावा ‘आहार’कडून करण्यात आला आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये उपाहारगृह व्यावसायिकांचे ३० टक्के नुकसान झाल्याची माहिती ‘आहार’ असोसिएशनचे अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी दिली. बहुतांश उपाहारगृह व्यावसायिक घरपोच पदार्थ पोहोचविण्यासाठी एकदाच वापर होणाऱ्या प्लास्टिकच्या डब्यांचा वापर करीत होते. मात्र एकदाच वापर होणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी आल्याने पुनर्वापर आणि पुर्नप्रक्रिया होणारे प्लास्टिकचे डबे वापरात येणार असल्याची माहिती शेट्टी यांनी दिली. २३ जूनपासून असोसिएशनचे सदस्य असणाऱ्या काही उपाहारगृहांनी अशा पद्धतीचे डबे वापरण्यास सुरुवात केली होती. मात्र पालिकेच्या पथकाने या डब्यांच्या पुनर्वापर होऊ शकत नाही, असे कारण देत काही उपाहारगृहमालकांकडून दंड आकारल्याचा दावा असोसिएशनने केला आहे. त्यामुळे एकदाच वापर होणाऱ्या आणि पुनर्वापर होणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंबाबत पालिकेच्या पथकामध्ये सुस्पष्टता नसल्याचे शेट्टी म्हणाले. यावर उपाय म्हणून पुनर्वापर होणाऱ्या डब्यांवर दंड आकारण्यात आल्यास त्याचे चित्रीकरण करण्याचा सल्ला परिपत्रकाद्वारे असोसिएशनने  सदस्यांना दिला आहे.

पदार्थाचे दर वाढवणार

पुनर्वापर आणि पुर्नप्रक्रिया होणाऱ्या डब्यांचा वापर करीत असल्यास त्याची माहिती असोसिएशनच्या परिक्षेत्र आधिकाऱ्याला द्यावी, असेही परिपत्रकात म्हटले गेले आहे. मुख्य म्हणजे पुनर्वापर होणाऱ्या डब्यांचा खरेदी खर्च वाढणार आहे. त्यामुळे पदार्थाचे दर वाढवून त्याची वसुली करण्यात येणार असल्याचे असोसिएशनकडून सांगण्यात आले आहे.