फेरीवाले, ग्राहकांना दोनशे रुपये दंड; तूर्त अंमलबजावणी कठीण

येत्या आठवडय़ाअखेर लागू होत असलेल्या प्लास्टिकबंदीनंतर किरकोळ विक्रेते व ग्राहक प्लास्टिकच्या पिशव्या, वस्तूंसह आढळल्यास त्यांना ५ हजार रुपयांऐवजी २०० रुपये दंड करण्याचा प्रस्ताव महानगरपालिका प्रशासनाने तयार केला आहे. दंड वसूल करताना होणारे वाद टाळून जास्तीत जास्त लोकांना नियम वापरण्यास उद्युक्त करण्यासाठी हा निर्णय उपयुक्त ठरेल, असे प्रशासकीय अधिकाऱ्यांना वाटते. मात्र हा प्रस्ताव या आठवडय़ात विधि समितीमध्ये चर्चेला येणार असून पालिका सभागृहाचीही मान्यता लागणार असल्याने २३ जूनआधी नवीन दंड लागू होण्याची शक्यता कमी आहे.

महाराष्ट्र अविघटनशील कचरा नियंत्रण अधिनियम २००६ नुसार नियमभंग केल्यास पहिल्या वेळी पाच हजार रुपयांपर्यंत आणि दुसऱ्या वेळी १० हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद आहे. आतापर्यंत महापालिका या नियमांच्या आधारे दंडवसुली करत आहे. मात्र अनेकदा हा दंड भरण्यावरून भाजीविक्रेते, फेरीवाले, मासेविक्रेते पालिका कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालतात असा अनुभव पालिका अधिकाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीत मांडला होता. काही वेळा पाच हजार रुपयांच्या जाचातून सुटण्यासाठी चिरीमिरी देण्याचा कल वाढतो व दंडाचा मूळ हेतू बाजूला पडतो. यावर उपाय म्हणून महापालिका क्षेत्रात प्लास्टिकच्या बंदी घातलेल्या वस्तू वापरणाऱ्या ग्राहक, किरकोळ विक्रेते, दुकानदार, मॉल यांना वेगवेगळ्या रकमांचे दंड करण्याचा प्रस्ताव  मांडण्यात आला आहे.

भाजी घेण्यासाठी जाणाऱ्या सर्वसामान्यांकडे पाच हजार रुपये असण्याची शक्यता फार कमी असते. किरकोळ विक्रेते, मासेविक्री करणाऱ्या महिलाही असा दंड भरायला तयार नसतात. दंडाचा हेतू हा लोकांना नियम वापरण्यासाठी उद्युक्त करण्यासाठी आहे. विधि समितीमधील चर्चेनुसार अंतिम निर्णय होईल. विधि समितीने हा प्रस्ताव फेटाळला किंवा पुढे ढकलला तर २३ जूनपासून किरकोळ विक्रेते व ग्राहकांनाही ५००० रुपये दंड भरावा लागेल.

हा धोरणात्मक प्रस्ताव असल्याने विधि समितीने मान्यता दिल्यावर तो पालिकेच्या मुख्य सभागृहात चर्चेसाठी जाईल. समितीचे प्रस्ताव ९० दिवसांच्या आत सभागृहात पाठवणे बंधनकारक असते. काही वेळा तातडीचे कामकाज म्हणूनही प्रस्ताव मंजूर होतात. मात्र सध्या असे तातडीचे प्रस्ताव थांबवण्यात आले आहेत, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे हा प्रस्ताव २३ जून आधी अमलात येण्याची शक्यता धूसर आहे.