घनकचरा विभागाकडून पालिका कार्यालयांना सूचना

प्लास्टिकच्या पातळ पिशव्यांवर बंदी घातल्यानंतर कचऱ्यासाठी काळ्या प्लास्टिक पिशव्यांची विक्री प्रचंड वाढली आहे. मात्र या पिशव्यांवर बंदी असून पालिकेतील कचराकुंडय़ांसाठी त्याचा वापर करू नये, असे पत्रक घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून सर्व विभाग कार्यालयांना पाठवण्यात आले आहे.

राज्य सरकारने प्लास्टिकच्या सर्व पिशव्यांवर बंदी घातली आहे. रोपवाटिका, खत तसेच कचऱ्यासाठी लागणाऱ्या विघटनशील पिशव्या वगळता इतर कोणत्याही पिशव्या वापरल्यास पाच हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. मात्र तरीही कचऱ्याच्या बादलीत लावता येणाऱ्या प्लास्टिकच्या काळ्या पिशव्यांची विक्री सर्रास सुरू असून लोकलमध्ये महिला मोठय़ा प्रमाणात या पिशव्या विकत घेताना दिसतात. पालिकेच्या शहरभरातील कार्यालयांमध्येही कचरा टाकण्यासाठी या पिशव्यांचा वापर केला जात होता. या पिशव्या पातळ असून विघटनशील नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर बंदी आहे. या पिशव्या पालिकेच्या कोणत्याही कार्यालयात दिसू नयेत यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख विश्वास शंकरवार यांनी बुधवारी ए ते टी विभागातील सर्व साहाय्यक आयुक्त आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे साहाय्यक अभियंते यांच्यासाठी पत्रक काढले आहे. यानुसार केवळ केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने विपणन आणि विक्री करण्याची परवानगी दिलेल्या कंपन्यांकडूनच या विघटनशील पिशव्या खरेदी करता येतील, सर्व विभाग कार्यालयांना कळवण्यात आले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने देशभरात आतापर्यंत केवळ तीन कंपन्यांना विघटनशील पिशव्यांचे उत्पादन करण्याची तर दोन कंपन्यांना विक्री करण्याची परवानगी दिली आहे. त्यातील एक उत्पादक व एक विक्री करणारी कंपनी मुंबईत असून इतर तीन कंपन्या चेन्नई, हरयाणा तसेच बंगलोरमध्ये आहेत.