कारवाईच्या निषेधार्थ कुल्र्यात बंद; दुकानदारांचा दंड देण्यास नकार

प्लास्टिकवरील कारवाईमुळे थेट व्यवसायावरच गदा येत असल्याची भावना व्यापाऱ्यांमध्ये वाढत असून मंगळवारी  कुल्र्यातील व्यापाऱ्यांनी उद्रेकाला वाट करून दिली. पालिका अधिकारी बळजबरीने दंड वसूल करत असल्याचा आरोप करत परिसरातील दुकानदारांनी एक तास दुकाने बंद करत कारवाईचा निषेध केला. शहरातील अन्य भागांतही आतापर्यंत २५ दुकानदारांनी दंड भरण्यास नकार दिला आहे.

सर्व प्रकारच्या पिशव्या तसेच एकदाच वापरून फेकल्या जाणाऱ्या प्लास्टिक व थर्माकॉलच्या वस्तू वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. याबाबत महानगरपालिकेने बाजार, दुकाने आणि आस्थापना, परवाना आदी विभागांतील सुमारे २४९ अधिकारी-कर्मचाऱ्यांना नियुक्त करून दंडात्मक कारवाई

सुरू केली आहे. मंगळवारी या पथकाने ५४४० दुकानांची पाहणी केली. मात्र त्यापैकी केवळ ९४ दुकानांमध्येच प्लास्टिकच्या प्रतिबंधित वस्तू आढळल्या.

त्यापैकी पालिकेने ७८ दुकानदारांकडून दंड वसूल केला. मात्र १६ जणांनी दंड नाकारल्याने त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.  सोमवारीदेखील नऊ जणांनी दंड भरण्यास नकार दिल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली.

सध्या तरी वेष्टन म्हणून वापरण्यात आलेल्या पिशव्यांना बंदी नाही. मात्र कुल्र्यात मंगळवारी सकाळी काही अधिकाऱ्यांनी या कारणाकरिता वापरण्यात आलेल्या पिशव्यांवरही दंड आकारण्यास सुरुवात केल्याने व्यापाऱ्यांमधील उद्रेक उफाळून आला.  कुर्ला पश्चिम विभागात पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कारवाईला सुरुवात केली. एका कपडय़ाच्या दुकानात काही कपडे प्लास्टिक पिशवीत आढळून आले. पालिका अधिकाऱ्यांनी या दुकानदाराला ५ हजारांची दंडाची पावती फाडून दिली. ही बाब इतर दुकानदारांना समजताच त्यांनी पालिका अधिकाऱ्यांच्या या मनमानी कारभाराचा विरोध केला. व्यापाऱ्यांनी सकाळी साडेअकरा ते साडेबारा या दरम्यान एक तास दुकाने बंद ठेवत या कारवाईचा निषेध केला. बाजारात कपडे व्यापाऱ्यांकडून प्लास्टिकचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला जातो. पारदर्शक प्लास्टिकच्या आवरणातून ग्राहकांना कपडय़ांचा रंग व्यवस्थित दिसू शकतो. तसेच या आवरणामुळे वस्तू धूळ बसून खराब होत नाही, असे मत बोरिवली येथील कपडे विक्रेत्याने व्यक्त केले.

प्लास्टिकबंदी कारवाई व दंड

  • गेल्या चार दिवसांत पालिकेने १३ हजार ५०१ दुकानांची तपासणी केली.
  • यापैकी २१० दुकानांमधून १० लाख ५० हजार रुपयांचा दंड गोळा करण्यात आला.
  • कारवाईत पालिकेने ९७२ किलो प्लास्टिक जप्त केले.
  • पालिकेच्या कारवाईला विरोध करत २५ दुकानदारांनी दंड देण्यास नकार दिला.

आमचा प्लास्टिकबंदीला

विरोध नाही. मात्र सध्या पावसाचे दिवस असल्याने विक्रीसाठी ठेवलेला माल खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठे नुकसान होणार असल्याने ते टाळण्यासाठी आम्हाला आणखी काही दिवसाचा अवधी मिळावा.   – जितेंद्र गुप्ता, व्यापारी