मुलं पळवणारी टोळी गावात शिरल्याच्या अफवेवरुन धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यात जमावाने पाच जणांची ठेचून हत्या केल्याच्या घटनेनंतर महाराष्ट्र पोलिसांनी आता अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी खबरदारी म्हणून काही पावले उचलली आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरणाऱ्या अफवा रोखण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी व्हॉट्सअॅप हेल्पलाईन सुरु केली आहे.

या उपक्रमातंर्गत पोलीस नियंत्रण कक्षातील व्हॉट्सअॅप क्रमांक प्रसिद्ध करण्यात आले असून सर्वसामान्य नागरिक या क्रमांकावर मेसेज पाठवून मदत मागू शकतात किंवा जी अफवा पसरली आहे त्यात कितपत तथ्य आहे याची माहिती मिळवू शकतात असे पोलीस महानिरिक्षक ब्रिजेश सिंह यांनी सांगितले. त्याचबरोबर व्हायरल झालेल्या ज्या अफवा आहेत त्या मागची सत्यता शोधून काढण्यासाठी पोलीस आता एसएम होक्सस्लेयर, बूम फॅक्टस आणि अल्ट न्यूज या फॅक्ट चेकिंग म्हणजे सत्यता तपासणाऱ्या वेबसाईटसची मदत घेत आहेत.

आम्ही राज्यभरात १ हजार फलक लावले असून त्यावर पोलीस नियंत्रण कक्षाचे व्हॉट्सअॅप क्रमांक दिले आहेत. राज्यभरात जागरुकता अभियान सुरु केले असून जिल्हा पातळीवर पोलीस अधिकारी पत्रकार परिषद घेऊन जी अफवा पसरली आहे ती कशा पद्धतीने हाताळावी याविषयी मार्गदर्शन करतील असे ब्रिजेश सिंह यांनी सांगितले.

महापुरुषांची बदनामी करणारा किंवा दोन समाजात तेढ निर्माण करेल असा मजकूर, छायाचित्र, चित्र फेसबूक, ट्विटर या माध्यमांवरून काढून टाकणे शक्य आहे. मात्र व्हॉट्सअ‍ॅपवरून दोन व्यक्तींमध्ये किंवा समूहात होणारा संवाद रोखणे, मध्यस्थी करणे पोलिसांच्या हाती नाही. त्यामुळे सध्या व्हॉट्सअ‍ॅप समूहांवर पोलिसांनी  लक्ष केंद्रित केले आहे.

पोलिसांकडून कार्यशाळा

सायबर पोलिसांनी नागरिकांच्या कार्यशाळा घेण्यास सुरुवात केली आहे. अफवा कशाला म्हणतात, त्याचे दुष्परिणाम, अफवांमुळे घडलेल्या घटना याबाबत कार्यशाळेत समजावून सांगण्यात येत आहे. व्हॉट्सअ‍ॅप समूह तयार केल्यावर सदस्य म्हणून कोणाची निवड करावी, सदस्यांकडून आक्षेपार्ह मजकूर समूहात पडल्यास तो तिथल्या तिथे कसा रोखून धरता येईल, या मजकुराबबात सर्वप्रथम पोलिसांना कसा संपर्क साधावा अशी माहिती कार्यशाळांमधून दिली जात आहे.