मुंबई पोलीसांचे संकेतस्थळ बघण्यासाठी जाणाऱया वाचकाला ऑनलाईन शॉपिंगच्या संकेतस्थळावर घेऊन जाण्याचा अजब प्रकार ‘लोकसत्ता डॉट कॉम’ने उघडकीस आणल्यानंतर खडबडून जागे झालेल्या पोलीसांनी गुरुवारी लगेचच आपल्या चुकीची दुरुस्ती केली. ‘लोकसत्ता डॉट कॉम’ने हा प्रकार प्रसिद्ध केल्यानंतर आता वाचक नेमकेपणाने मुंबई पोलीसांच्या संकतेस्थळापर्यंत पोहोचू लागले आहेत. लोकसत्ता डॉट कॉममुळेच मुंबई पोलीसांनी आपली चूक सुधारली असल्याची प्रतिक्रियाही एका जागरूक वाचकाने दिली.
महाराष्ट्र राज्य पोलिसांची वेबसाईट (http://www.mahapolice.gov.in/) पाहताना त्यातील ‘जनरल इन्फो’ विभागात दिलेल्या ‘इंम्पॉर्टंट लिंक्स’वर क्लिक केले असता काही महत्वाच्या लिंक्स समोर येतात. यातील मुंबई पोलीस या लिंकवर क्लिक केले असता, वापरकर्ता http://madamebridal.com/ या ऑनलाईन शॉपिंगसाठी असलेल्या संकेतस्थळावर जात होता. त्यामुळे मुंबई पोलिसांचे संकेतस्थळ पाहण्यासाठी आलेल्याच्या पदरी निराशा येत होती. वाचकांना चुकीच्या संकेतस्थळावर घेऊन गेल्यामुळे महिलांच्या वस्तू मुंबई पोलीस ऑनलाईन कधीपासून विकायला लागले, असाही प्रश्न नेटिझन्स विचारू लागले होते.