नवी मुंबई महापालिकेत भाजपाला धक्का बसला आहे. तुर्भे येथील भाजपाच्या नगरसेवकांनी ‘कमळा’ची साथ सोडत शिवबंधन बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित चारही नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

नवी मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे. सर्वच पक्षांनी निवडणुकीची मोर्चे बांधणी सुरू केलेली असताना भाजपाला धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी तुर्भेतील भाजपाच्या चार नगरसेवकांनी राजीनामे दिले होते. महापालिका आयुक्त अण्णा मिसाळ यांच्याकडे राजीनामे सुपूर्द केल्यानंतर भाजपाला गळती लागल्याचं बोललं जात आहे.

स्थायी समितीचे माजी सभापती सुरेश कुलकर्णी, त्यांच्या पत्नी नगरसेविका राधा कुलकर्णी, संगीता वास्के आणि मुद्रिका गवळी यांनी राजीनामा देण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा शासकीय निवासस्थानी भेट घेतली होती. अलिकडेच सुरेश कुलकर्णी यांनी आयोजित केलेल्या हळदीकुंकू समारंभाला शिवसेनेचे नेते आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यावेळीच कुलकर्णी शिवसेनेत जाण्याविषयीची चर्चा सुरू झाली होती.

गणेश नाईकांसमोर आव्हान-

नवी मुंबई महापालिकेत दबदबा असलेल्या गणेश नाईक यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अनेक नगरसेवक भाजपात गेले होते. मात्र, राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर अनेकांची घरवापसी सुरू झाली आहे. त्यात नाईक गटाबरोबरच भाजपाला एक झटका महाविकास आघाडीनं दिला आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ही गळती थोपवण्याचं आव्हान भाजपाबरोबर नाईक यांच्यासमोर असणार आहे.

सहा नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर –

भाजपात प्रवेश केलेले आणखी सहा नगरसेवक राष्ट्रवादीत घरवापसी करणार असल्याचं वृत्त आहे. भाजपाचे नगरसेवक संदीप सुतार, सलोजा सुतार, शुभांगी पाटील, शशिकला पाटील, चंद्रकांत पाटील आणि राजू शिंदे या नगरसेवकांनी अलिकडेच उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे ते घरवापसी करणार असल्याचे बोललं जात आहे.