देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि एकनाथ खडसे यांची भेट घेतल्यानं तर्कविर्तकांच्या चर्चांनी राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. वेगवेगळ्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. तर दुसरीकडे लवकरच भाजपा सत्तेत येणार असल्याची विधानं भाजपा नेत्यांकडून वारंवार केली जात आहे. या सगळ्या प्रकरणावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाष्य केलं आहे. “इतर पक्षातून भाजपामध्ये गेलेले आमदार स्वगृही परतू नये म्हणूनच भाजपा सत्तेत येण्याची तारीख पे तारीख देत आहे,” असा टोला मलिक यांनी लगावला.

देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसेंच्या घरी; राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपाच्या सत्तेत येण्याच्या विधानांचा समाचार घेतला. “भाजपाचे नेते सत्ता येणार असं वारंवार सांगत तारीख पे तारीख देत आहेत. पण एकही भविष्यवाणी सत्य होत नसल्यानं ते हताश झालं आहेत. त्यामुळेच महाविकास आघाडी सरकार विरोधात एककलमी कार्यक्रम हे नेते राबवत आहेत,” अशी टीका मलिक यांनी केली.

एकनाथ खडसे आणि फडणवीसांमध्येही बोलणं झालं; रक्षा खडसे यांची महत्वाची माहिती

“इतर पक्षातून भाजपामध्ये गेलेले आमदार स्वगृही परतू नयेत, या भीतीमुळे राज्यात लवकरच सत्ता येणार असल्याचं भाजप नेते सांगत आहेत. परंतु महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकजुटीने काम करत आहेत. करोना, चक्रीवादळ, अवकाळी पाऊस अशा अडचणी आलेल्या असतानाही या सर्व परिस्थितीवर मात करून जनतेला मदत करण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकारनं घेतली असल्यानं जनता संतुष्ट आहे. पण सत्ता येणार असं बोलून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचं काम भाजप नेते करत आहेत,” असंही मलिक म्हणाले.