मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनी केलेल्या एका वक्तव्यावरून राज्याच्या राजकारणात मोठ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. राजकीय पक्ष स्वबळाची भाषा करत राहिले, तर लोक जोड्याने मारतील, उद्धव ठाकरे म्हणाले होते. ठाकरे यांच्या बोलण्याचा रोख नेमका कुणाकडे होता, यावरून तर्कवितर्क लावले जात असतानाच काँग्रेस आणि भाजपातूनही प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आता उद्धव ठाकरे यांच्या विधानाचा हवाला देत भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.

शिवसेनेच्या ५५वा वर्धापन दिन शनिवारी (१९ जून) झाला. यानिमित्ताने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातील शिवसैनिकांना संबोधित केलं. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमधील मित्रपक्ष काँग्रेस वारंवार निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा करीत असून, याचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. तसेच सत्ताप्राप्तीसाठी आतुर विरोधकांवरही त्यांनी निशाणा साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानावरून भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.

हेही वाचा- शिवसेना सत्तेसाठी लाचार होणार नाही!- उद्धव ठाकरे

“एकमेकांशी लढून, गरळ ओकून, सत्तेसाठी एकत्र आलेल्यांच्या गळ्यात लोक काय हारतुरे घालणार आहेत? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात, विरोधात लढले, तर लोक जोड्याने मारतील… भीती खरीये. लोकांनी तुमच्यासाठी जोडे तयार ठेवलेत. फक्त निवडणुकांची प्रतीक्षा आहे,” अशी टीका भातखळकर यांनी केली आहे.

हेही वाचा- त्यांचं कौतुक आहेच कारण त्यांनी समोरासमोर लढाई केली; उद्धव ठाकरेंना भाजपाचा टोला

…तर लोक जोड्याने मारतील

करोनावर केवळ नियंत्रण आल्यानं प्रश्न सुटणार नाहीत. कोविडोत्तर आरोग्य आणि आर्थिक समस्या मोठ्या आहेत. येत्या काळात आपलं कसं होणार, अशी चिंता देशातील आणि राज्यातील जनतेला आहे. या आर्थिक प्रश्नांकडे देशात कोणाचं लक्ष नाही. केवळ सत्ताप्राप्ती आणि निवडणुकांचं राजकारण हा विकृत खेळ सुरू राहिला, तर देशातील आर्थिक परिस्थिती बिघडेल व देशात अस्वस्थता पसरेल. लोकांच्या अडचणी सोडवण्याचा विचार न करता राजकीय पक्ष स्वबळाच्या घोषणा देत बसले, तर लोक जोड्याने मारतील,” असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.