महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि लोकसत्तातर्फे अभिनव संकल्प स्पर्धा

शहरातील हवा, पाणी आणि ध्वनी प्रदूषणासोबतच गेल्या काही वर्षांत कचऱ्याच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. ओला व सुक्या कचऱ्यासोबतच इ कचऱ्याचेही प्रमाण वाढत असताना काही गृहनिर्माण संस्थांनी मात्र कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी पावले उचलली आहेत. महानगरांमधील अशा संस्थांना प्रोत्साहन व इतरांना प्रेरणा देण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि लोकसत्ताने अभिनव संकल्प स्पर्धा २०१७ चे आयोजन केले आहे.

महानगरांमधून रोजच्या रोज हजारो टन कचरा कचराभूमीवर टाकला जातो. वर्षांनुवर्षे साठलेल्या कचऱ्याच्या ढिगांमुळे अनेक समस्या निर्माण होतात. कचरा निर्माण होतो, त्याच जागी त्याची विल्हेवाट लावल्यास प्रदूषणाची समस्या तर कमी होईलच शिवाय कचरा वाहतूक व कचरा भूमीवर होत असलेल्या खर्चातही कपात होऊ शकते. यासंबंधी राज्य व केंद्र स्तरावर जागृती सुरू आहे. त्याला प्रतिसाद देत कचरा प्रदूषणाच्या समस्येवर काही गृहनिर्माण संस्थांनी उपाय शोधला आहे. गृहनिर्माण संस्था व संकुलात गोळा होणाऱ्या कचऱ्याचे त्याच ठिकाणी ओला, सुका व इ कचरा असे वर्गीकरण करून त्यांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली जात आहे. या संकुलांना त्यांच्या कामामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांचा आदर्श इतरांसमोर मांडण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने स्पर्धेचे आयोजन केले आहे. लोकसत्ताचे या स्पर्धेला साहाय्य लाभले आहे.

मुंबई महानगर प्रदेशातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, मिरा- भाईंदर, वसई-विरार, उल्हासनगर आणि पनवेल महानगरपालिकांमध्ये तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड, अमरावती, नागपूर, औरंगाबाद आणि नाशिक या शहरातील गृहनिर्माण संकुलांना या स्पर्धेत सहभागी होता येईल. या स्पर्धेसाठी दहा लाख रुपयांहून अधिक रकमेची पारितोषिके देण्यात येणार आहेत. इच्छुक स्पर्धकांनी ३१ मार्च पूर्वी mpcbnewyear@gmail.com यावर प्रवेशिका पाठवाव्यात. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर न्यू इअर ग्रीन रिझोल्यूशन कॉन्टेस्ट २०१७ या अंतर्गत या स्पर्धेसंबंधी संपूर्ण माहिती, नियम व अटी देण्यात आल्या आहेत.