News Flash

स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या मागण्या तथ्यहीन

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची भूमिका

( संग्रहीत छायाचित्र )

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची भूमिका

स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांच्या बहुतांशी मागण्या या शासनाच्या धोरणाशी संबंधित आहेत, तर काही मागण्यांबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कार्यवाही सुरू केली आहे, अशी भूमिका आगोयाने घेतली आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून राज्यभर काढण्यात येणारे मोर्चे आणि आंदोलनांबाबत आयोगाने प्रथमच आपले मौन सोडले आहे. आयोगाच्या परीक्षांमध्ये गैरप्रकार होत असल्याचे चुकीचे चित्र उभे करण्यात येत असल्याचेही आयोगाचे म्हणणे आहे.

राज्यातील शासकीय पदांच्या भरतीसाठीच्या परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येतात. शासकीय पदांच्या भरतीत कपात केल्यामुळे आयोगाच्या परीक्षांसाठीची पदे घटली. त्याविरोधात राज्यभरात उमेदवारांनी आंदोलने सुरू केली आहेत. त्याचप्रमाणी शासकीय भरतीमधील घोटाळेही समोर आले. औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि इतरत्र उमेदवारांचे मोर्चे, आंदोलने होऊनही याबाबत आयोगाने काहीच भूमिका जाहीर केली नव्हती. मात्र आता उमेदवारांच्या मागण्या या शासकीय धोरणांशी निगडित असल्यामुळे आयोगाकडून काहीच करता येऊ शकत नसल्याची भूमिका आयोगाने घेतली आहे. उमेदवारांच्या अनेक मागण्यांमध्ये तथ्य नाही. त्याचप्रमाणे ज्या मागण्या आयोगाशी संबंधित आहेत त्यांच्याबाबत कार्यवाही सुरू असल्याचेही आयोगाचे म्हणणे आहे. प्रत्येक मागणीबाबत आयोगाने आपले म्हणणे मांडले आहे.

उमेदवारांच्या मागण्या आणि आयोगाचे स्पष्टीकरण

  • मागणी – राज्यसेवा परीक्षेच्या पदसंख्येत वाढ करावी, राज्य व जिल्हा पातळीवरील रिक्त जागा भरण्यात याव्यात

आयोगाचे उत्तर – शासकीय धोरणांबाबतच्या मागण्या

  • मागणी – पोलिस उपनिरीक्षक, कर निरीक्षक या पदांसाठी स्वतंत्र परीक्षा घ्याव्यात

उत्तर – या पदांसाठी पूर्वीही संयुक्त परीक्षाच होती. एका न्यायालयीन प्रकरणामुळे वेळापत्रकांत बदल करावे लागले आणि तेव्हापासून स्वतंत्र परीक्षा घेण्याची सुरूवात झाली. तिनही पदांच्या पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम एकच आहे. संयुक्त परीक्षेमुळे उमेदवारांच्याच वेळेची आणि पैशाची बचत होत आहे. पूर्व परीक्षेचा निकाल स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येतो आणि मुख्य परीक्षाही स्वतंत्र होतात.

  • मागणी – बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घ्यावी

उत्तर – बायोमेट्रिक हजेरी घेण्यासाठी आयोग प्रयत्नशील असून त्यासाठीच उमेदवारांना आधार क्रमांक देणे बंधनकारक करण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या लघुलेखक परीक्षेसाठी बायोमेट्रिक हजेरी घेण्यात आली. त्यासाठी परीक्षेपूर्वी दीम्डतास आधी उमेदवारांना केंद्रावर पोहोचावे लागले.

  • मागणी – परीक्षा केंद्रावर मोबाईल जॅमरचा वापर करावा

उत्तर – आयोगाने यापूर्वीच सात महत्वाच्या परीक्षांमध्ये मोबाईल जॅमर बसवण्याचा प्रयोग केला आहे. या पुढील कार्यवाही सुरू आहे.

  • मागणी – बारकोडचा वापर करावा

उत्तर – गेल्या अनेक वर्षांपासून आयोगाच्या परीक्षेत उत्तरपत्रिकांवर बारकोडचा वापर करण्यात येत आहे.

  • मागणी – प्रतिक्षा यादी लावावी

उत्तर – राज्यसेवा, अभियांत्रिकी सेवा वगळता ९८ टक्के परीक्षांसाठी गुणवत्ता यादी ही प्रतिक्षा यादी म्हणून वापरण्यात येते. मात्र मोठय़ा परीक्षांमध्ये बहुसंवर्गीय निवड प्रक्रियेत प्रतिक्षा यादी जाहीर करणे व्यवहार्य नाही. त्यामुळे भविष्यात सेवा ज्येष्ठता आणि पदोन्नती संबंधातील वाद उद्भवू शकतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2018 1:38 am

Web Title: maharashtra public service commission comment on mpsc exam
Next Stories
1 मातृभाषेतील शिक्षणच उत्तम होय!
2 सोलापुरी चादर, टॉवेलची जबाबदारी ‘पतंजली’ घेणार
3 एक वर्षांत राज्य मोतीबिंदू मुक्त करणार
Just Now!
X