मुंबई : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या प्रत्येक राज्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या गुणवत्ता तपासणीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कामगिरी अव्वल ठरली आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार तपासणी या वर्षी मे महिन्यात करण्यात आली होती. त्यामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ८२.९३ टक्के गुण मिळवून प्रथम गुणवत्तेत प्रथम क्रमांक पटकावला.

जानेवारी २०१९ मध्ये राष्ट्रीय हरित लवादाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला देशभरातील सर्व प्रदूषण मंडळांच्या गुणवत्तेचे तपासणी करण्याचे आदेश दिले होते. पर्यावरणविषयक गुणवत्ता मापन, कायद्याची अंमलबजावणी आणि दैनंदिन व प्रतिबंधात्मक उपाययोजना, माहिती (डेटा) व्यवस्थापन व लोकसंपर्क, निर्णयक्षमता व संशोधन, प्रगती व प्रशिक्षण या मुद्दय़ांच्या आधारे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही तपासणी केली होती.

‘पर्यावरणविषयक कायद्याच्या अमंलबजावणीतील तत्परता, संमतीपत्रांचा निपटारा, प्लास्टिकबंदी, हवा गुणवत्ता तपासणी आणि जलप्रदूषण नियंत्रणाकरिता उचललेली पावले, पर्यावरणपूरक दिवाळी, होळी, गणपती आणि आंतरशालेय नाटय़स्पर्धा अशा विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे कामकाजाची गुणवत्ता वाढल्याचे,’ मत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव ई.रवींद्रन यांनी व्यक्त केले.

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे डिजिटायझेशन, संगणकीय प्रणालीच्या ऑनलाइन सेवांमध्ये बदल, औद्योगिक आस्थापनांनी करावयाच्या अर्जाची संख्या कमी करण्यावर भर देऊन ईज डुइंग बिझनेसला चालना आणि कर्मचारी व अधिकाऱ्यांची सकारात्मक मानसिकता यामुळे मंडळाने ही गुणवत्ता प्राप्त केली आहे.

सुधीर श्रीवास्तव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष