५११ केंद्रांवर शनिवारपासून लसीकरण

मुंबई : राज्यात येत्या शनिवारपासून करोना लसीकरणाला सुरुवात होणार असून सिरम इन्स्टियूटच्या ‘कोविशिल्ड’ लशीच्या ९ लाख ६३ हजार कुप्या प्राप्त झाल्या आहेत. राज्यातील ५११ केंद्र लसीकरणासाठी सज्ज झाली असून ‘कोविन अ‍ॅप’वर आत्तापर्यत सुमारे सात लाखाहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झालेली आहे.

राज्यात ५११ केंद्रावर लसीकरण होणार आहे. यात ११९ ग्रामीण रुग्णालय, ८३ उपजिल्हा रुग्णालय, ६९ वैद्यकीय महाविद्यालय, ५९ नागरी आरोग्य केंद्र, ४३ महापालिका रुग्णालय, २३ प्राथमिक आरोग्य केंद्र, २३ खासगी रुग्णालय, २२ जिल्हा रुग्णालय, २२ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, ८ सामान्य रुग्णालय, ७ महापालिका रुग्णालय, ४ महिला रुग्णालयांचा समावेश आहे. या ठिकाणी वीज, इंटरनेट, वेबकास्ट आदी सुविधा करण्यात आल्या आहेत. लसीकरणासाठी प्राधान्यक्रमाने गट ठरविण्यात आले असून पहिल्या गटात आरोग्य कर्मचारी यामध्ये शासकीय व खाजगी आरोग्य संस्थामधील सर्व कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका आदींचा समावेश आहे. मंगळवारी कोविशिल्ड लशींच्या ९ लाख ६३ हजार कुप्या प्राप्त झाल्या असून येत्या दोन दिवसांत  केंद्रावर यांचा पुरवठा केला जाणार आहे. एका ठिकाणी किमान १०० जणांना लसीकरण करण्यात येईल. लसीकरणासाठीच्या पथकामध्ये ५ सदस्यांचा समावेश असणार आहे, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास यांनी दिली.

मंगळवारी रात्री बारापर्यतच नोंदणी

को—विन अ‍ॅपवर ७ लाख ८४ हजारापेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे.

मंगळवार मध्यरात्री १२ वाजेपर्यंत नोंदणी प्रक्रिया सुरु राहणार आहे.

३ हजार १३५ शीतसाखळी केंद्र

राज्यात राज्यस्तरीय एक, विभागीय स्तरावर नऊ, जिल्हास्तरावर ३४, महानगरपालिकास्तरावर २७, असे शीतगृह तयार असून ३ हजार १३५  शीतसाखळी केंद्र उपलब्ध आहेत. वॉक इन कुलर — २१, वॉक इन फ्रिजर —४, आय एल.आर. ४१५३, डिप फ्रीजर— ३९३७ आहेत. केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या १२०० व्हॅक्सिन कॅरियरचा पुरवठा जिल्हा व महापालिकांना करण्यात आला आहे. वरील वॉक इन कुलर, वॉक इन फ्रिजर हे कोल्हापूर, ठाणे, औरंगाबाद, लातूर, अकोला, नागपूर, पुणे व नाशिक या विभागीयस्तरावर स्थापित करण्यात आले आहेत.

लसीकरणासाठी जिल्हानिहाय केंद्रांची संख्या

अहमदनगर—२१, अकोला—५, अमरावती—९, औरंगाबाद—१८, बीड—९, भंडारा—५, बुलडाणा—१०, चंद्रपूर—११, धुळे—७, गडचिरोली—७, गोंदिया—६, हिंगोली—४, जळगाव—१३, जालना—८, कोल्हापूर—२०, लातूर—११, मुंबई—७२, नागपूर—२२, नांदेड—९, नंदूरबार—७, नाशिक—२३, उस्मानाबाद—५, पालघर—८, परभणी—५, पुणे—५५, रायगड—७, रत्नागिरी—९, सांगली—१७, सातारा—१६, सिंधूदुर्ग—६, सोलापूर—१९, ठाणे—४२, वर्धा—११, वाशिम—५, यवतमाळ—९ असे एकूण ५११ केंद्र आहेत.