राज्यातील करोना संकट कधी टळणार? हा प्रश्न पडलेल्या नागरिकांची चिंता वाढावी अशीच आकडेवारी आज समोर आली आहे. राज्यात करोनाचा शिरकाव झाल्यापासून पहिल्यांदाच दिवसभरात इतक्या मोठ्या प्रमाणात बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्णांची संख्या ३,१०,४५५ इतकी झाली आहे. तर मुंबईत बाधित रुग्णांची संख्या मोठी आहे. दिवसभरात मुंबईत करोनामुळे ६४ जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिवसभरात आढळून आलेल्या करोना बाधित रुग्णांची आकडेवारी ट्विट केली आहे. राज्यात आज ९,५१८ करोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण संख्या आता ३,१०,४५५ इतकी झाली आहे. आज ३,९०६ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत एकूण १,६९,५६९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १,२८,७३० इतकी आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

मुंबईत २४ तासात आढळले एक हजार करोना बाधित

मुंबईतील करोना बाधित रुग्णांची संख्याही मोठी असून, गेल्या २४ तासात १ हजार ४६ करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ६४ जणांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईतील एकूण रुग्णांचा आकडा १,०१,२२४ इतका असून, आतापर्यंत एकूण ५,७११ लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत २३ हजार ८२८ रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती बृह्नमुंबई महापालिकेनं दिली आहे.