नांदेड ४.०५ अंशावर ल्लमुंबई ‘जैसे थे’ ; अलिबागमध्ये मात्र उकाडा
उत्तर भारतापाठोपाठ महाराष्ट्रही थंडीच्या कडाक्याने गारठला आहे. मराठवाडय़ात रविवारी तर विदर्भात रविवारी आणि सोमवारी थंडीची लाट उसळेल, असा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्य़ांमध्ये तापमानात कमालीची घट झाली असली तरी मुंबईतील परिस्थिती ‘जैसै थे’ आहे. राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद शनिवारी नांदेडमध्ये ४.५ अंश सेल्सियस एवढी झाली तर सर्वाधिक म्हणजे ३३.७ अंश सेल्सियस तापमान अलिबागमध्ये नोंदले गेले.
शनिवारी विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात थंडीचा जोर सर्वाधिक होता. मुंबईच्या तापमानात शुक्रवारच्या तुलनेत दोन अंश सेल्सिअसने घसरण झाली आहे. गेले काही दिवस मुंबईसह राज्यामध्ये थंडीने हुडहुडी भरू लागली आहे. मुंबईत रात्रीच्या वेळी शेकोटय़ा धगधगू लागल्या आहेत. मुंबईत शनिवारी १६.६ अंश से. तापमानाची नोंद झाली. त्यामुळे शनिवारीही थंडीचा तडाखा कायमच होता. कोकण आणि गोव्यातील किमान तापमानात किंचितशी घट झाली आहे. थंडीपेक्षा उष्णतेच्या लाटेसाठी प्रसिद्ध असलेल्या विदर्भात गेल्या तीन दिवसांपासून थंडीची लाट कायम आहे. शुक्रवारी सर्वात कमी ७.६ अंश सेल्सिअस तापमानाची गोंदियात नोंद झाली. मात्र, शनिवारी तेथे पाऱ्याने आणखी खाली उतरत ६.५ अंश तापमान गाठले. थंडीमुळे नागपूरही बरेच गारठले आहे.
दोन दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यासह नगर, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्य़ात थंडीने मुक्काम ठोकला आहे. पुण्यात किमान तापमानाचा पारा ६.६ अंश सेल्सियसवर आला. रविवारीही थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्ये थंडीबरोबरच सकाळी उशिरापर्यंत धुक्याची चादर पसरली होती. कडाक्याच्या थंडीमुळे ऊस तोडणीलाही अनेक ठिकाणी विलंब झाला.
औरंगाबाद शहरात मागील चार दिवसांपासून थंडी वाढली असून, शनिवारी पारा ८.०६ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला.

Capture