राज्यातील बहुचर्चित आदर्श घोटळ्यात अधिकाराचा गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आल्याने निलंबीत अधिकारी प्रदीप व्यास आणि जयराज फाटक यांना पुन्हा कामावर रुजू करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या दोघांनाही पुन्हा सेवेत रुजू करून घेतले आहे.
फाटक आणि व्यास यांना पुन्हा सेवेत रुजू करण्यावर स्पष्टीकरण देताना, सरकारी अधिसूचनेनुसार सरकारी कर्मचाऱयाला दोन वर्षांपेक्षा अधिक काळासाठी निलंबीत ठेवता येत नाही. फाटक आणि व्यास दोघेही दोन वर्षांपेक्षा अधिका काळासाठी निलंबीत होते. यामध्ये निलंबीत करण्यात आलेल्या काळापासून दोन वर्षांच्या आत चौकशी प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे असते परंतु, त्यांच्याविरोधातील चौकशीही अजूनही सुरू आहे. त्यामुळे फाटक आणि व्यास यांना सेवेत रुजू करण्यात आले आहे.
आदर्श घोटाळ्याप्रकरणी चौकशी सुरू असताना केंद्रीय अन्वेषण विभागाने(सीबीआय) केलेल्या तपासात फाटक आणि व्यास यांच्यावर ठपका ठेवण्यात आल्यामुळे २२ मार्च २०१२ रोजी दोघांना निलंबीत करण्यात आले होते. आता दोन वर्षांनंतर फाटक आणि व्यास यांना पुन्हा सेवेत रुजू होण्याचे पत्र मिळाले आहे.
जयराज फाटक यांनी सांगितले की, “मला कामावर पुन्हा रुजू करण्यात आले आहे. हे कायदेशीर प्रक्रियेनेच होत असून माझी नवीन नियुक्ती कोणत्या विभागात करण्यात आली आहे. हे स्पष्ट झालेले नाही. ज्यापदावर माझी नियुक्ती करण्यात येईल ते स्विकारण्यास मी तयार आहे”
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याआधीही राज्यातील एका महत्वाच्या पदावर कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाऱयाला आरोपांवरून निलंबीत केल्यानंतर दोन वर्षांत चौकशी पूर्ण न झाल्याने निलंबनाचा कालावधी वाढविण्यासाठी शासनाने केंद्राकडे शिफारस केली होती. परंतु, यावेळी या दोन अधिकाऱयांच्या बाबतीत असे करण्यात आलेले नाही.
तसेच शासनाच्या नियमावलीनुसार, या दोनही निलंबीत अधिकाऱयांना त्यांच्या निलंबीत कार्यकाळात  एकूण वेतनापैकी ७५ टक्के वेतनही मिळत होते.