याकुब मेमन याच्या फाशीच्या शिक्षेच्या मुद्द्यावरून बुधवारी विधीमंडळामध्ये गोंधळ उडाला. सत्ताधारी शिवसेनाच्या आमदारांनी याकुबला फाशी झालीच पाहिजे, अशी मागणी करीत विधानभवनाच्या पायऱयांवर धरणे आंदोलन केले. विधानसभेच्या कामकाजावेळीही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
याकुबची फाशी रद्द करण्याची मागणी काही विरोधी पक्षातील आमदारांनी केल्यानंतर त्याविरोधात भूमिका सत्ताधारी आमदारांकडून घेण्यात आली. याकुबची फाशी रद्द करा, अशी मागणी ज्यांनी केली आहे. त्यांचे सदस्यत्वच रद्द करण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली. या मुद्द्यावरून ट्विटरवर प्रतिक्रिया मांडणाऱया अभिनेता सलमान खानचाही त्यांनी निषेध केला. ‘बजरंगी भाईजान’ चित्रपट पाकिस्तानात चालावा, यासाठीच सलमान खानने याकुबची बाजू उचलून धरल्याचा आरोप सरनाईक यांनी केला. विधानसभेमध्ये कामकाजावेळी भाजप आमदार आशिष शेलार यांनी हा मुद्दा उपस्थित केला. शिवसेनेच्या आमदारांनी ‘अतिरेकी याकुब मेमनला फाशी झालीच पाहिजे’, असे पोस्टरही विधानभवनाबाहेर झळकावले.
दरम्यान, याकूब मेमनसंदर्भात न्यायालय जो निकाल देईल, तो आम्हाला मान्य आहे, अशी भूमिका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मांडली. काही आमदारांनी व्यक्त केलेल्या मताचा विपर्यास करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात निर्णय देण्यास न्यायालय सर्वोच्च असल्याचे त्यांनी सांगितले.