१४ मार्चला हजर राहण्याचे आदेश
महाराष्ट्र सदन, इंडिया बुल्स आदी प्रकरणांत काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल असलेल्या तीन गुन्ह्य़ांप्रकरणी चौकशी करण्यासाठी सक्तवसुली महासंचालनालयाने अखेर राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना समन्स बजावले आहे. भुजबळ यांना १४ मार्च रोजी महासंचालनालयापुढे हजर राहावे लागणार आहे.
या व्यवहारातून भुजबळ कुटुंबीयांना मिळालेल्या ८७० कोटी रुपयांबाबत महासंचालनालयाकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणी माजी खासदार समीर भुजबळ यांना अटक करण्यात आली असून ते अद्याप न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणी महासंचालनालयाने पंकज भुजबळ यांना सलग दोन दिवस चौकशीसाठी पाचारण केले होते. आता छगन भुजबळ यांना १४ मार्च रोजी हजर राहण्याचे समन्स बजावले आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार राज्याचा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) आणि सक्तवसुली महासंचालनामार्फत संयुक्त चौकशी सुरू आहे. एसीबीने या प्रकरणी गुन्हे दाखल केल्यानंतर सक्तवसुली महासंचालनालयाने काळा पैसा प्रतिबंधक कायद्यानुसार स्वतंत्र गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.
या प्रकरणी सुरुवातीला समीर व पंकज भुजबळ यांना वारंवार समन्स पाठविण्यात आले. परंतु ते गैरहजर राहिल्यामुळे अखेरीस महासंचालनालयाने समीर भुजबळ यांना अटक केली. त्यावेळी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड अर्जात ८७० कोटी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेपैकी फक्त ११४ कोटींचा शोध लागला आहे, असे नमूद केले होते. शासकीय कंत्राटे देण्याच्या माध्यमातून मिळालेले कोटय़वधी रुपये विविध कंपन्यांच्या माध्यमातून गुंतविण्यात आले. रोखीने मिळालेल्या रकमेच्या मोबदल्यात धनादेशाद्वारे कंपन्यांच्या नावे कोटय़वधी रुपये घेण्यात आले आहेत. यासाठी अनेक बनावट कंपन्याही स्थापन करण्यात आला. यापैकी काही निधी परदेशात पाठविण्यात आला. परदेशातून काही निधी पुन्हा या कंपन्यांच्या खात्यांमध्ये वळता करण्यात आला आहे. या सर्व बाबींची चौकशी करायची आहे, असे त्यावेळी रिमांड अर्जात नमूद होते. समीर भुजबळ हे न्यायालयीन कोठडीत असून त्यांनी अद्याप जामीनासाठीही अर्ज केलेला नाही. ते कोठडीत असतानाच आता छगन भुजबळ यांना चौकशीसाठी पाचारण करण्यात आले आहे. शासकीय कंत्राटातून आपल्याला लाच मिळालेली नाही. जी काही रक्कम समीर व पंकज यांच्या विविध कंपन्यांमध्ये आहे ती त्यांनी रीतसर बांधकाम तसेच पुनर्विकास प्रकल्पातून मिळविली आहे, असा भुजबळ यांचा युक्तिवाद आहे. सक्तवसुली महासंचालनालयापुढे भुजबळ स्वत: चौकशीसाठी हजर राहणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

पंकज भुजबळ धर्मादाय आयुक्तांपुढे हजर
मुंबई एज्युकेशन ट्रस्टमधील (एमईटी) कथित १७८ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी धर्मादाय आयुक्तांपुढे सुरू असलेल्या सुनावणीसाठी पंकज भुजबळ हे मंगळवारी हजर राहिले. एमईटीचे विश्वस्त सुनील कर्वे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर धर्मादाय आयुक्तांपुढे सुनावणी सुरू आहे.