|| निशांत सरवणकर

५० वर्षांपर्यंत आर्थिक मदतीच्या आश्वासनांची खैरात; महाराष्ट्र सदन प्रकल्पात झोपडीवासीयांची चांदी

माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना तुरुंगाची हवा खायला लावणारा अंधेरी आरटीओ झोपु प्रकल्प तेथील झोपडीवासीयांसाठी मात्र सोन्याचे अंडे देणारी कोंबडी ठरला आहे. या प्रकल्पासाठी नवा विकासक नेमण्याची प्रक्रिया सुरू असून या निवडणूक प्रक्रियेत विकासकांनी झोपडीवासीयांवर हुंदाई गाडी, महिंद्र क्लब मेंबरशिप, पाच लाखांचा विमा, मुलीच्या शिक्षणासाठी प्रत्येक वर्षी एक लाख या प्रमाणे दहा वर्षांपर्यंत आर्थिक मदत आदी आश्वासनांची खैरात केली आहे. तीन ते पाच हजार कोटींचा हा प्रकल्प लाटण्यासाठी विकासकांमध्ये कमालीची चुरस लागली आहे.

या भूखंडावर झोपु योजना राबविण्यासाठी मे. चमणकर यांनी एल अँड टी व प्राईम डेव्हलपर्स यांच्याशी संयुक्त भागीदारी केली होती. परंतु मे. चमणकर यांना या योजनेतून काढून टाकण्यात आल्यामुळे आता नवा विकासक नेमण्यासाठी ३ ऑक्टोबर रोजी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.

एल अँड टी -एसएसएम रिएल्टींसह गुजरातमधील मोठी बांधकाम कंपनी असलेली मानव इन्फ्रास्ट्रक्चर, मोहिनी इंजिनिअर्स, शिव इन्फ्रास्ट्रक्चर, क्षितिजा इन्फ्रास्ट्रक्चर्स, जेआरटी आदी सहा विकासक सध्या शर्यतीत असले तरी एल अँड टी-एसएसएम आणि मानव इन्फ्रास्ट्रक्चर यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच असून त्यांनीच आश्वासनांची खैरात केली आहे. याबाबत एल अँड टीचे सुधीर कुलकर्णी यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही तर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर यांनीही मौन बाळगणे पसंत केले.

एल अँड टीने काळ्या यादीत टाकलेल्या विकासकाच्या पत्नी व मुलगा संचालक असलेल्या कंपनीसोबत भागीदारी केल्याचा मुद्दा सध्या गाजत आहे.

अण्णानगर झोपु योजनेतील २०४ पैकी १५५ झोपडीवासीयांना मे. चमणकर इंटरप्राईझेसने घरे बांधून दिली आहेत. तरीही निवडणूक प्रक्रियेत ४६२ झोपडीवासीयांना (कासम नगर – १५९; विठ्ठल रखुमाई नगर – ९९) मतदानाची संधी मिळणार आहे.

विकासकाला या योजनेत फक्त ३०७ घरे बांधून द्यायची आहेत. त्याबदल्यात २२ हजार चौरस मीटरचा अंधेरी आरटीओचा भूखंड चार इतक्या चटईक्षेत्रफळासह विकासकाला मिळणार असल्यामुळेच घोडेबाजाराला उत आला आहे.

सहा विकासकांमध्ये स्पर्धा

  • अंधेरी येथील प्रादेशिक परिवहन विभागाच्या भूखंडावर असलेल्या झोपडपट्टीचे पुनर्वसन मे. के. एस. चमणकर यांनी सुरू केले.
  • अण्णानगर शिवशक्ती, कासमनगर आणि विठ्ठल रखुमाई नगर अशा तीन योजना एकत्र करून त्या मोबदल्यात विकासकाकडून महाराष्ट्र सदन, अंधेरीतील आरटीओ कार्यालय, सेवानिवासस्थाने, चाचणी ट्रॅक, मलबार हिल येथील अतिथीगृह आदी बांधकामे शंभर कोटी रुपयांत करून घेण्यात येणार होती.
  • या बदल्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचा भूखंड विकासकाला झोपु योजनेतील विक्री करावयाच्या इमारतीसाठी देण्यात येणार होता. या भूखंडावर झोपु योजना राबविण्यासाठी मे. चमणकर यांनी एल अँड टी व प्राईम डेव्हलपर्स यांच्याशी संयुक्त भागीदारी केली होती.

सहा विकासक रिंगणात आहेत. यापैकी सर्वाधिक मते मिळविणारा विकासक अंतिम ठरेल. काळ्या यादीत नाव नसल्याचे हमीपत्र प्रत्येक विकासकाला द्यायला सांगण्यात आले आहे    – सुनील धोंडगे, निवडणूक अधिकारी