समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे समाजवादी पक्षातून निलंबन केल्यानंतर त्याचे पडसाद राज्यासह महाराष्ट्रातही उमटले आहेत. महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबु आझमी यांनी मुलायमसिंह यादव यांचा निर्णय दुर्दैवी असून, आमचा अखिलेश यादव यांना पाठिंबा असेल, अशी प्रतिक्रिया एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे. दरम्यान, अखिलेश यादव आणि रामगोपाल यादव यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्यानंतर अखिलेश यांच्या समर्थकांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठी गर्दी केली होती.

मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासोबत संपूर्ण देश आहे, असे सांगून त्यांनी अखिलेश यादव यांच्या बाजुने असल्याचे सांगितले आहे. मुलायमसिंह यांच्या निर्णयाने मला दुःख झाले आहे. त्यांनी इतका मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पक्षाची कमकुवत बाजू समोर आली आहे. याचा सांप्रदायिक शक्तींना फायदा होणार आहे, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. मुलायमसिंह यांचा निर्णय दुर्दैवी आहे. अखिलेश यादव हे नेताजींचेच चिरंजीव आहेत. जो काही वाद झाला होता, तो घरातच सोडवणे गरजेचे होते. पण दुर्दैवाने तसे काही झालेच नाही, असेही अबु आझमी म्हणाले.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तारखा काही दिवसांनीच जाहीर होणार आहेत. त्यापूर्वीच तिकीटवाटपावरून सत्ताधारी समाजवादी पक्षात मोठी फूट पडली आहे, असे यावरून दिसत आहे. पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यांनी उमेदवारांची यादी घोषित केल्यानंतर मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही दुसरी यादी जाहीर केली. त्यामुळे नाराज झालेल्या मुलायमसिंह यादव यांनी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि सरचिटणीस रामगोपाल यादव यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई केली आहे.त्या दोघांनाही पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित केले आहे.