मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी निधीच्या शोधात असलेल्या राज्य सरकारला रविवारी मोठा दिलासा मिळाला. मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेच्या पाश्र्वभूमीवर या प्रकल्पासाठी लागणारे सुमारे ४६ हजार कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य करण्यास संयुक्त अरब अमिरातची बिन झयेद इंटरनॅशनल एलएलसी ही वित्तीय संस्था पुढे आली असून त्याबाबतच्या सामंजस्य करारावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. त्यामुळे सरकारने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

मुंबई-नागपूर या शहरांमधील ७०० किलोमीटरचे अंतर अवघ्या सहा तासांच्या प्रवासावर आणणाऱ्या आणि विदर्भ-मराठवाडा-खान्देशला कोकणाशी जोडणाऱ्या ‘समृद्धी द्रुतगती महामार्गासाठी आवश्यक जमिनीपैकी  ६२ टक्के जमीन महामंडळाच्या ताब्यात आली आहे. त्यानुसार महामंडळाने आता नागपूर ते नाशिकदरम्यानच्या १३ पॅकेजसाठी वित्तीय निविदा काढल्या असून निविदा भरण्याची अंतिम तारीख २८ मार्च आहे. या १३ टप्प्यांमध्ये सुमारे ६०० किलोमीटर लांबीच्या महामार्गाची बांधणी करण्यात येणार असून त्यासाठी २१ हजार ८९२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. काम सुरू झाल्यानंतर  ३० महिन्यांत काम पूर्ण करण्यात येणार असून हे काम करणाऱ्या कंपन्यांवर सबंधित रस्त्यांच्या देखभालीची चार वर्षांची जबाबदारी टाकण्यात आली आहे.

‘स्टार्टअपला’ चालना देणार

मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेच्या निमित्ताने रविवारी राज्य सरकार आणि ‘मॉनेटरी अ‍ॅथॉरिटी ऑफ सिंगापूर’ यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सहकार्य करार करण्यात आला. सिंगापूर आणि महाराष्ट्र यांच्यात वित्तीय सेवांमध्ये संशोधनाला प्रोत्साहन देणे आणि स्टार्टअपला चालना देण्यासाठी परस्परांना सहकार्य करण्यावर करारात भर देण्यात आला आहे. त्यानुसार दोन्ही देशांतील विद्यापीठादरम्यान परस्पर सहकार्य, ज्ञानाचे आदानप्रदान आणि शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या हेतूने माहिती आणि अनुभवांची देवाणघेवाण होणार आहे.

आनंद महिंद्रा-रतन टाटा यांचे खडेबोल

टाटा समूहाचे रतन टाटा व महिंद्रा समूहाचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या व्यासपीठावरून सरकारचे कान टोचले. राज्यातील पायाभूत सुविधांचा विकास मागे पडला होता, आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्याला गती दिली आहे, असे विधान रतन टाटा यांनी केले. तर ग्रामीण महाराष्ट्राची ताकद व मुंबई शहर हे महाराष्ट्राच्या प्रगतीचे दोन प्रमुख घटक आहेत. मुंबई शहर हे मागे पडत आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासाच्या काही प्रकल्पांचा उल्लेख केला. पण तुमचे मुंबईबाबतचे स्वप्न काय ते सांगा, आम्हीही त्यात हातभार लावू, असे आनंद महिंद्रा म्हणाले.

मॅग्नेटिक महाराष्ट्र म्हणजे  स्वप्नरंजन-विखे

राज्य सरकारने देश-विदेशातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आयोजित केलेल्या मॅग्नेटिक महाराष्ट्रच्या निमित्ताने तीच ती स्वप्ने आणि तीच ती आश्वासने आणि त्याच त्या घोषणा अशी घोषणाबाजी नागरिकांनी रविवारी पुन्हा अनुभवली.  हा महाराष्ट्र मॅग्नेटिक नव्हे तर नैराश्यवादी झाल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र म्हणजे फक्त स्वप्नरंजन असल्याची टीकाही केली. पंतप्रधानांनी मुंबईत मॅग्नेटिक महाराष्ट्रावरून आत्मस्तुती करण्यापेक्षा नैराश्यवादाबाबत आत्मपरीक्षण केले असते तर  महाराष्ट्राच्या पदरात काही तरी पडले असते. या परिषदेच्या माध्यमातून राज्याच्या हाती काही लागेल असे वाटत नाही असेही विखे  यांनी सांगितले.