राष्ट्रवादीचा विरोध कशाला, मुख्यमंत्र्यांचा गुगली; पवारांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव

शरद पवार हे दूरदृष्टी असलेले नेते आहेत. विदर्भाच्या विकासासाठी नागपूर व मुंबई ही दोन शहरे अधिक जवळ यावीत, अशी कल्पना पवारांनी १९८२ मध्ये विधानसभेत केलेल्या भाषणात मांडली होती. सरकार आता या दोन शहरांना जोडणारा दुवा म्हणून समृद्धी मार्ग बांधणार आहे. या मार्गाची पवारांचीच योजना होती. त्यातूनच किमान राष्ट्रवादीने तरी समृद्धी मार्गाला विरोध करू नये, असा गुगली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत टाकला.

शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीस ५० वर्षे तर आमदार गणपतराव देशमुख यांच्या विधिमंडळातील कारकिर्दीस ५५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल या दोन नेत्यांच्या अभिनंदनाचा ठराव विधानसभेत मंजूर करण्यात आला. ठराव मांडताना मुख्यमंत्र्यांनी पवार यांच्या कार्याचा गौरव केला. समृद्धी मार्गाला होणाऱ्या विरोधाच्या पाश्र्वभूमीवर १९८२ मध्ये विरोधी पक्षनेते असताना पवारांनी विधानसभेत केलेले भाषणच मुख्यमंत्र्यांनी वाचून दाखविले. त्या भाषणात पवार यांनी विदर्भाच्या विकासाबाबत स्पष्ट मते मांडली आहेत. विदर्भात उद्योग वाढवून रोजगारनिर्मिती करावी तसेच नागपूर ते मुंबई ही दोन शहरे अधिक जोडली जावीत, असे मत मांडले होते याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. समृद्धी मार्गाला काँग्रेस व राष्ट्रवादीकडून विरोध केला जात आहे. पवारांचे भाषण लक्षात घेता राष्ट्रवादीने यापुढे तरी मार्गाला विरोध करू नये, असे आवाहनही फडणवीस यांनी केले. आधुनिक महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारणावर पगडा असलेले पवार राजकारण, क्रिकेटसह साऱ्या खेळपट्टय़ांवर अष्टपैलू खेळाडू म्हणून यशस्वी झाल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.

१९६२ पासून १९९५चा अपवादवगळता ११ वेळा विधानसभेवर निवडून आलेल्या गणपतराव देशमुख यांनी देशात विक्रम केला आहे. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी हे १० वेळा निवडून आले आहेत. चार वर्षे मंत्रिपदवगळता ५१ वर्षे विरोधी पक्षाचे सदस्य म्हणून त्यांनी केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

‘दोन घोडचुका नडल्या’

काँग्रेस सोडण्याचा आणि संरक्षणमंत्रीपद सोडून राज्यात मुख्यमंत्रिपदी परत येण्याच्या दोन घोडचुका शरद पवार यांनी आयुष्यात केल्याचे माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी सांगितले.१९९९ मध्ये शरद पवार यांनी काँग्रेस सोडायला नको होती; अन्यथा ते पंतप्रधान झाले असते. कारण इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्यानंतर जनाधार असलेला नेताच काँग्रेसजवळ नव्हता. सध्याचे राजकारण हवेवर चालते आणि कोण कुठे जाते हेच समजत नाही, असे सांगताना गणपतराव देशमुख यांनी कधीही शेकाप पक्ष सोडला नाही हे सांगितले.

फक्त राष्ट्रवादीच्याच बाकांवर उपस्थिती

शरद पवार आणि गणपतराव देशमुख यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला तेव्हा विधानसभेतील उपस्थिती तशी विरळच होती. चर्चा सुरू होण्यापूर्वी आमदारांनी सभागृहात परतावे म्हणून राष्ट्रवादीचे आमदार राहुल मोटे आवाहन करीत होते. चर्चा सुरू झाल्यावर अजित पवार आमदारांची यादीच घेऊन बसले होते व कोण आमदार अनुपस्थित आहेत त्या नावांवर फुली मारीत होते. मुख्यमंत्र्यांचे भाषण संपल्यावर सत्ताधारी बाकांवर तर फारच अल्प उपस्थिती होती. पंकजा मुंडे, विष्णू सावरा आणि एकनाथ शिंदे हे तीनच मंत्री बराच काळ सभागृहात होते.

चिटोराही हाती लागला नाही

शरद पवार यांच्यावर राजकीय कारकिर्दीत अनेक आरोप झाले. ट्रकभर पुरावे सादर करण्याची भाषा केली गेली. पण पुराव्याचा एक साधा चिटोराही कोणी सादर करू शकले नाही, याकडे राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी लक्ष वेधले. कर्करोगासारख्या दुर्धर आजाराच्या विरुद्धची लढाईही त्यांनी हसतहसत जिंकली. राज्याच्या हिताचेच त्यांनी निर्णय घेतले, असेही पाटील यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, आशीष शेलार, एकनाथ शिंदे आदी सदस्यांची पवार आणि देशमुख यांच्या कार्याचा गौरव करणारी भाषणे झाली.

‘महाराष्ट्राचा राजकीय अक्षांश-रेखांश जाणणारा एकमेव नेता’

महाराष्ट्राचा भौगोलिक आणि राजकीयही अक्षांश-रेखांश जाणणारा नेता, सर्वच खेळपट्टय़ांवर तेवढय़ाच ताकदीने खेळणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आणि राज्याच्या व देशाच्या विकासात मोलाचे योगदान देणारा नेता म्हणजे शरद पवार, अशा शब्दात  विधान परिषदेत शरद पवार यांच्या राजकीय कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्यात आला.

शरद पवार आणि शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या राजकीय कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण झाली, त्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव विधान परिषदेत मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवार यांच्या राजकीय, सामाजिक, कृषी, आदी क्षेत्रांत केलेल्या भरीव कार्याचा उल्लेख केला. गणपतराव देशमुख म्हणजे राजकारणातील चालते-बोलते विद्यापीठ आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी शरद पवार यांच्या अनेक दुर्मीळ आठवणी सांगितल्या. जांभूळपाडा येथे महापूर आला होता, त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते. देशाचे पंतप्रधान राजीव गांधी यांना घेऊन ते पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले. त्यावेळी जीपमध्ये राजीव गांधी यांना बसवून स्वत वाहन चालवत त्या भागाचा दौरा केला. १९९९ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार आले. परंतु रायगड जिल्ह्य़ातील राजकारणाचा परिणाम म्हणून शेकापच्या मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला, त्याला मी कारणीभूत होतो. त्यावेळी शरद पवार माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. हेलिकॉप्टरमधून प्रवास करताना, प्रसंगी पायलटला दिशा देणारा, राज्याचा भौगलिक आणि राजकीय अक्षांश-रेखांश जाणणारा एकमेव नेता म्हणजे शरद पवार, असे त्यांनी त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले.

‘काँग्रेसमध्ये बंड करावे लागते’

काँग्रेस नेते नारायण राणे म्हणाले की, शरद पवार यांच्याकडे पाहिले, की हे व्यक्तिमत्त्व कोणत्या रसायनाने तयार झाले आहे, असे कुतुहल माझ्या मनात निर्माण होते. एकदा ब्रीचकॅंडी रुग्णालयात पवार दाखल झाल्याचे कळल्यावर सायंकाळी त्यांना भेटायला गेलो. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि घरी परतलो. तर दुसऱ्या दिवशी ते सांगलीच्या दौऱ्यावर गेल्याचे कळले. इतके अफाट कष्ट करणारा आणि सर्व क्षेत्रातील जाण असणारा नेता दुसरा नाही. काँग्रेसमध्ये आल्यावर मला मुख्यमंत्री करणार असे चालले होते. दिल्लीला गेलो तर, अशोक चव्हाण यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर केले. त्यावेळी मी बंड केले. शरद पवार यांचा दुसऱ्या दिवशी सकाळीच फोन आला. काँग्रेसमध्ये तुम्ही बंड केले, मीही दहा-बारा वेळा बंड केले आहे. बंड केल्याशिवाय काँग्रेसमध्ये मोठे होता येत नाही, असे ते विनादाने म्हणाले. पण माझ्यासाठी ते नैतिक बळ होते, असा किस्साही राणे यांनी ऐकवला.