नो पार्किंगमध्ये गाडी पार्क करण्यास विरोध केला म्हणून महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. मुंबईच्या हार्बर रेल्वे मार्गावरील टिळक नगर रेल्वे स्थानकात 17 मे रोजी हा प्रकार घडला आहे. दरम्यान, मारहाणीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

17 मे रोजी अब्दुल अन्सारी या रेल्वे कर्मचाऱ्याने त्याची दुचाकी रेल्वे स्थानकसमोरील नो पार्किंग विभागात उभी केली. ड्युटीवर असलेले महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान शंकर मनोहर आव्हाड यांनी त्यास विरोध केला. त्यावर आपण रेल्वेचे कर्मचारी असल्याचे सांगत अन्सारीने आव्हाड यांना धमकावले. त्यानंतर फोन करुन नातेवाईक आणि मित्रमंडळीना फोन करुन त्या ठिकाणी बोलावले आणि त्यांच्या सहाय्याने अन्सारीने शंकर आव्हाड यांना बेदम मारहाण केली.

याप्रकरणी, नेहरुनगर पोलिसांनी अब्दुल अन्सारीसह त्याचा भाऊ इरफान अन्सारीला अटक केली आहे. तर इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.