उल्हासनगर, अंधेरीपाठोपाठ साकीनाक्यामध्ये दहावीची प्रश्नपत्रिका फुटल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. साकीनाका, काजुपाडा येथील शाळेत असलेल्या परीक्षा केंद्रावर काही विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर माहिती तंत्रज्ञान विषयाची प्रश्नपत्रिका आढळली. शाळेने साकीनाका पोलिसांना बोलावून तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा नोंदवून पोलिसांनी ही प्रश्नपत्रिका पुरवणाऱ्या फिरोज युसूफ अन्सारी आणि मुजम्मील इक्बाल काझी या दोन शिक्षकांना अटक केली. हे दोघे साकीनाका आणि मीरारोड येथे खासगी शिकवणी घेतात, अशी माहिती चौकशीतून उघड झाली आहे.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा शिस्तबद्ध पद्धतीने होण्यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात येत असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सांगण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात परीक्षेत गैरप्रकार सुरूच असल्याचे समोर येत आहे. हे. सोमवारी दहावीची सामाजिकशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर सापडली होती.