दहावीत ८०-९० टक्क्यांदरम्यानच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट;  द्वितीय, तृतीय श्रेणीतील विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत यंदा मुंबईचा निकाल ९०.०९ टक्के लागला असून गतवर्षीच्या तुलनेत उत्तीर्णाची टक्केवारी दोन टक्क्यांनी घसरली आहे. दुसरीकडे, यंदा उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये ८० ते ९० टक्क्यांदरम्यान गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली असल्याने कनिष्ठ महाविद्यालयीन प्रवेशासाठीची किमान गुणमर्यादा (कट ऑफ) चांगलीच घसरण्याची शक्यता आहे. याचा फायदा द्वितीय व तृतीय श्रेणीत गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार असला तरी, गतवर्षीच्या

तुलनेत या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने या दोन श्रेणीतील विद्यार्थ्यांमध्येच प्रवेशासाठी चुरस दिसून येणार आहे.

मुंबई विभागात यंदा तीन लाख ४२ हजार ९७३ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी तीन लाख आठ हजार ९९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात एक लाख ६० हजार १३८ मुलगे तर एक लाख ४८ हजार ८५८ मुलींचा समावेश आहे. यंदा निकाल गतवर्षीच्या तुलनेत १.८१ टक्क्यांनी खालावला आहे. याचबरोबर गुणवत्ताही खालावली आहे.

यंदा ६० टक्के मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत ४४ हजार ५८२ इतकी वाढली आहे. या द्वितीय श्रेणीतील विद्यार्थ्यांची संख्या २१ हजार ६२९ तर उत्तीर्ण श्रेणीतील (पास क्लास) विद्यार्थ्यांची संख्या २२ हजार ९५३ इतकी आहे. यामुळे यंदा प्रवेशासाठी द्वितीय व उत्तीर्ण श्रेणीतील विद्यार्थ्यांमध्ये चुरस पाहावयास मिळणार आहे. तसेच यंदा ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाणही ८,६४५ने कमी झाले आहे. यामुळे शहरातील महाविद्यालयांची कटऑफही खालावणार आहे.

मुंबई विभागात पूर्व उपनगरचा निकाल सर्वाधिक ९१.३२ टक्के इतका लागला आहे तर सर्वात कमी निकाल पश्चिम उपनगराचा ८७.८१ टक्के इतका लागला आहे.

असे असले तरी, चांगल्या महाविद्यालयांतील जागेसाठी राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांची सीबीएसई, आयसीएसई या मंडळांच्या विद्यार्थ्यांशीही स्पर्धा असेल. या स्पर्धेत यंदा तरी अन्य मंडळांचे विद्यार्थी बाजी मारतील, अशी शक्यता आहे.

मुंबई विभागाचा निकाल

ठाणे – ९०.५९

रायगड – ८९.९३

’ पालघर – ८९.६०

मुंबई शहर – ९०.४४

’ पूर्व उपनगर – ९१.३२

’ पश्चिम उपनगर – ८७.८१

’ एकूण – ९०.०९


टक्केवारीनुसार विद्यार्थी

’ ९०+ टक्के  – १०१५७

’ ८५ ते ९० टक्के – १५७८२

’ ८० ते ८५ टक्के – २१०१०

’ ७५ ते ८० टक्के – २६०२५

’ ७० ते ७५ टक्के – ३०२८६

’ ६५ ते ७० टक्के – ३४३२५

’ ६० ते ६५ टक्के – ४१८६६

’ ४५ ते ६० टक्के – १०४७८७

’ ४५ टक्क्यांहून कमी –   ४२९१८

१,५९,६८२ : अकरावीसाठी मुंबई महानगर क्षेत्रातील एकूण जागा

३,०८,९९६ : मुंबई विभागातून दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या