देवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास; सेनेला मुख्यमंत्रिपद देण्याचा निर्णय झाला नसल्याचा पुनरुच्चार

मुख्यमंत्री पद अडीच वर्षे शिवसेनेला देण्याबाबत कोणताही निर्णय झाला नव्हता याचा पुनरुच्चार करतानाच, महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असतानाही शिवसेनेने त्याचा अनादर करीत संवाद थांबवल्याने मुदतीत सरकार स्थापन करता आले नाही, असे सांगत काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, भाजपच्या नेतृत्वाखालीच सरकार स्थापन होईल, असा ठाम विश्वास शुक्रवारी व्यक्त केला.

सरकार स्थापनेसाठी आम्ही फोडाफोडीचे राजकारण करणार नाही, अशी ग्वाही देताना शिवसेनेने संवाद थांबविला असला तरी युती तुटलेली नाही, असे नमूद करीत अद्यापही सेनेचा पर्याय खुला ठेवल्याचे संकेतही फडणवीस यांनी दिले.

मावळत्या विधानसभेची मुदत संपुष्टात येत असल्याच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दुपारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पदाचा राजीनामा सादर केला. त्यानंतर पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्यामुळेच सरकार स्थापन करता आले नाही, असे खापर फोडले. विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीला स्पष्ट बहुमत दिले आणि भाजपने १०५ जागा जिंकल्या. दुर्दैवाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निकालाच्या दिवशीच सरकार स्थापन करण्याचे सर्व पर्याय खुले आहेत, असे विधान पत्रकार परिषदेत केले होते. तेव्हाच आम्हाला आश्चर्य वाटले होते. तरीही आम्ही युतीचे सरकारच येईल, अशी भूमिका घेतली. त्यानंतर १५ दिवस सातत्याने पत्रकार परिषदेत भाजपविरोधात अनुचित भाषेत वक्तव्ये केली गेली. आम्ही त्यांना त्याच भाषेत उत्तर देऊ शकतो. पण आम्ही तसे करणार नाही. ती आमची संस्कृती नाही, असे फडणवीस यांनी सुनावले.

अडीच वर्षे मुख्यमंत्री पद शिवसेनेला देण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. तेव्हा शिवसेनेशी युतीची चर्चा आम्ही थांबवली होती. नंतर ती पुन्हा सुरू झाली, पण त्या चर्चेत या विषयावर निर्णय झाला नव्हता. परंतु उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात झाला असेल तर मला माहिती नाही, असे मी दिवाळीच्या काळात म्हणालो. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी चर्चा थांबवली. मुख्यमंत्री पद शिवसेनेला देण्याचा कोणताही निर्णय झाला नव्हता, असे अमित शहा यांनीही आपल्याकडे स्पष्ट केले, असे फडणवीस यांनी सांगितले. यात कोणाला खोटे ठरवण्याचा प्रश्न नाही तर त्याबाबत निर्णय झाला नव्हता इतकाच मुद्दा आहे, असेही फडणवीस म्हणाले.

सरकार स्थापनेसाठी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. नंतर त्यांनी आपल्याला फोनही केला नाही. त्यांना भाजपशी चर्चा करायला वेळ नाही. पण काँग्रेस-राष्ट्रवादीशी चर्चा करण्यास वेळ आहे, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

दिवसातून तीनदा शिवसेनेच्या वतीने राष्ट्रवादीशी चर्चा करण्यात येत होती. शिवसेनेचे हे धोरण योग्य नाही. भाजपवर टीका करून काही काळ प्रसिद्धी जरूर मिळेल, पण सरकार स्थापन करता येणार नाही हे शिवसेनेने लक्षात घ्यावे, असा टोलाही फडणवीस यांनी हाणला. आम्ही कधीही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका केली नाही. २०१४ मध्ये एकमेकांविरोधात निवडणूक लढवूनही आम्ही उद्धव ठाकरेंवर टीका केली नाही. मात्र, आमचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने टीका केली गेली. असे सरकार कशाला चालवायचे, असा प्रश्न पडतो. भाजप-शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळूनही सरकार स्थापन करू शकलो नाही, याची खंत वाटते, असे फडणवीस यांनी नमूद केले.

टीका थांबवली तरच चर्चा!

आम्ही फोडाफोडीचे राजकारण करणार नाही. त्याची गरजच पडणार नाही. पण राज्यात जे सरकार येईल ते भाजपच्या नेतृत्वाखालीच येईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. युती तुटलेली नाही आणि युतीची दारे आम्ही बंद केलेली नाहीत. आमच्या नेत्यांवरील टीका थांबवणार असेल तरच चर्चा होईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.